मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमाची सुरुवात २३ एप्रिलपासून होणार आहे. या मोसमासाठी प्रत्येक टीमने जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. याचबरोबर प्रत्येक टीम त्यांची रणनिती ठरवत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू जहीर खान याच्याकडे आयपीएलच्या या मोसमात मुंबईच्या संचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जहीर खाननं मुंबई टीमच्या पत्रकार परिषदेमध्ये लिलावात युवराज सिंगला का घेतलं? याबद्दल खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या लिलावामध्ये युवराज सिंगवर सुरुवातीला कोणत्याच टीमने बोली लावली नाही. अखेर दुसऱ्या सत्रामध्ये मुंबईने युवराजला १ कोटी रुपयांना विकत घेतलं. 'युवराजकडे खूप अनुभव आहे, त्यामुळे तो आमच्यासाठी मधल्या फळीत महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. युवराज मॅच विनर आहे. आम्हाला अशा बॅट्समनची गरज होती, ज्याला मधल्या फळीत खेळण्याचा मोठा अनुभव असेल. यासाठी आम्ही युवराजला टीममध्ये घेतलं,' असं जहीर म्हणाला.


'युवराज हा मागच्या अनेक वर्षांपासून आपल्या टीमला मॅच जिंकवून देत आला आहे. युवराजपेक्षा चांगलं काम कोणताही दुसरा खेळाडू करू शकत नाही. आम्ही त्याला नेटमध्ये खेळताना बघितलं आहे, तो चांगली बॅटिंग करत आहे. या मोसमात त्याचं लक्ष चांगली कामगिरी करण्यावर आहे. युवराज आल्यामुळे आमची टीम आणखी मजबूत झाली आहे,' अशी प्रतिक्रिया जहीरने दिली.


युवराज आयपीएल लिलावाच्या पहिल्या सत्रात का विकला गेला नाही? याचं उत्तरही जहीरने दिलं. 'अनेक खेळाडू पहिल्या सत्रामध्ये विकले गेले नाहीत. मीही त्यापैकी एक आहे. लिलावादरम्यान प्रत्येक टीम आपल्या रणनितीनुसार काम करते. लिलावात नेमकं काय करायचं आहे हे प्रत्येक टीमला पाहावं लागतं,' असं वक्तव्य जहीरने केलं.


जहीरसोबत असलेल्या मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने वर्ल्ड कपच्या दृष्टीने आयपीएलवर भाष्य केलं. आयपीएलनंतर लगेचच खेळाडूंना वर्ल्ड कपसाठी जायचं आहे. शारिरिक तणावामुळे वर्ल्ड कपदरम्यान खेळाडू दुखापतग्रस्त होऊ शकतात, अशी भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच खेळाडूंनी आयपीएलदरम्यान काही सामन्यांमध्ये विश्रांती घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. पण रोहितने मात्र विश्रांती घ्यायची जबाबदारी आणि निर्णय ही प्रत्येक खेळाडूची आहे, असं वक्तव्य रोहित शर्माने केलं.


'तुम्हाला तुमच्या शरिराकडे लक्ष द्यावं लागतं. जर माझ्या शरिराला आराम हवा असेल, तर मी आराम करीन आणि जर खेळत राहावसं वाटत असेल, तर मी खेळत राहीन, असं रोहितने स्पष्ट केलं. हे सांगतानाच रोहित म्हणाला, 'वर्ल्ड कपकडे पाहता वर्कलोड महत्त्वपूर्ण आहे. पण ही स्पर्धाही जगातली सगळ्यात मोठी आहे. यामुळे प्रत्येक खेळाडूने स्वत:चा निर्णय घ्यावा'.


आयपीएल २०१९ : ठरलं! रोहित शर्मा ओपनिंगला खेळणार