यूट्युबवर व्हिडिओ पाहण्याचं व्यसन, अघोरी प्रयोगाने मुलीचा मृत्यू
पंधरा वर्षांच्या मुलीला यूट्युबवर व्हिडीओ पाहण्याचं व्यसन लागले. थेट स्वर्गात कसं जाता येईल याचा ध्यास लागलेल्या मुलीचा मृत्यू झाला.
मुंबई : एक धक्कादायक बातमी. मुंबईतल्या पंधरा वर्षांच्या मुलीला यूट्युबवर व्हिडीओ पाहण्याचं व्यसन लागले. थेट स्वर्गात कसं जाता येईल, याचे व्हिडीओ ती सातत्याने यूट्यूबवर पाहायची आणि त्यातूनच तिने एक अघोरी प्रयोग केला. त्यात तिचा मृत्यू झाला. इंटरनेटवर असलेला हा एक भयानक गूढ व्हिडिओ. अॅस्ट्रा ट्रॅव्हलर असे म्हणतात. म्हणजेच तुमच्या आत्म्याला बाहेर बोलवायचे. काही काळ त्याच्याशी बोलायचं आणि मग पुन्हा आत्मा शरीरात शिरतो, असलं काहीतरी भलतं सलतं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.
श्रावणी घोलप. वय वर्षे १५. भोईवाड्यातल्या बीडीडी चाळीत ती राहायची. मात्र, यू-ट्युबच्या व्यसनापायी १५ वर्षांच्या श्रावणीचा मृत्यू झाला. श्रावणीला याच अॅस्ट्रा ट्रॅव्हलर व्हिडिओ पाहण्याचा नाद लागला होता. ती सतत यूट्यूबवर हे व्हिडिओ बघायची. असे करुन थेट स्वर्ग गाठता येतो, आत्म्याशी बोलता येतं असं श्रावणीला वाटायचे. त्या दिवशी श्रावणीच्या वडिलांचा वाढदिवस होता. कोणी कल्पनाही केली नसेल इतके धक्कादायक पुढे घडले.
स्वर्गात जाण्यासाठी श्रावणीने आधी हॉलमध्ये प्रयत्न केला. आजीने हटकल्याने मग ती बाथरुममध्ये गेली तिने आपल्या ओढणीने गळफास घेतला आणि तिचा मृत्यू झाला. श्रावणी असे काही करू शकेल याचा जराही अंदाज तिच्या आई वडिलांना नव्हता. ब्लू व्हेल, पोकेमॉन गो अशा खेळांमुळे लहान मुलांचे बळी गेले आहेत. पालकांनो, तुमची मुले इंटरनेटवर काय पाहतायत, त्यावर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवा. न कळत्या वयात मुलांच्या हाती इंटरनेटचं मायाजाल लागले आहे. त्यातून घडणाऱ्या या घटना दुर्दैवी आणि धक्कादायक आहेत.