...तर आठवड्यातून साडेतीन दिवसच ऑफिस! `या` सीईओने व्यक्त केलं 3.5 Day Week चं भाकित
Working Hours In Office To Reduce If...: जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये फाइव्ह डेज विक, सिक्स डेज विक असं काम केलं जातं. काही देशांमध्ये अगदी फोर डेज विकही आहे. मात्र हा कालावधी आता अधिक कमी होणार आहे.
Working Hours In Office To Reduce If... : जे. पी. मॉर्गन या जगप्रसिद्ध कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी डायमॉन यांनी आर्टिफिशीअल इंटेलिजन्ससंदर्भात (एआय) एक आगळं-वेगळं निरिक्षण नोंदवलं आहे. ज्याप्रकारे हे एआय तंत्रज्ञान विकसित होत आहे ते पाहता यामुळे वर्क-लाइफ बॅलेन्स साधणं अधिक सहज सोपं होणार असल्याचं जेमी यांनी म्हटलं आहे. एआयच्या मदतीने कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास नक्कीच कमी होईल असा विश्वास व्यक्त करताना यामुळे कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवसांऐवजी साडेतीन दिवसच काम करावं लागणार आहे. म्हणजेच जेमी यांनी लवकरच जगभरातील अनेक कार्यालयांमध्ये सध्याच्या '5 डेज विक' शेड्यूलऐवजी '3.5 डेज विक' टाइमटेबल पाहायला मिळेल असं सूचित केलं आहे.
आपलं आयुष्यमान वाढणार
'ब्लुमबर्ग टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये जेमी यांनी, एआयचा विकास झाल्याने लोकांचं आयुष्य वाढेल असा अंदाज जेमी यांनी व्यक्त केला आहे. एआयचा कामाच्या ठिकाणी अधिक वापर झाल्यास माणूस 100 वर्षांपर्यंत जगेल. असं तंत्रज्ञान मानवाला अधिक दिर्घकाळ आणि अधिक सुदृढ जगण्यासाठी फायद्याचं ठरेल, असं जेमी म्हणाले आहेत. खरं तर जेमी हे पारंपारिक पद्धतीने काम करण्याचं समर्थन करणारे उच्चपदस्थ अधिकारी म्हणून ओळखले जातात. भरपूर काम करणे, ऑफिसमध्येच येऊन काम करणे यासारख्या गोष्टींसाठी जेमी आग्रही असल्याचं 'बिझनेस स्टॅण्डर्ड'ने म्हटलं आहे. मात्र आता जेमी यांनी लोकांना एआयबरोबर बदलणाऱ्या वर्क कल्चरशी जुळवून घेत नव्या गोष्टी स्वीकारत त्या शिकून घेण्याचं आवाहन केलं आहे.
एआय हे जिवंत तंत्रज्ञान
"तुमची मुलं 100 वर्ष जगणार आहेत. विकसित तंत्रज्ञानामुळे त्यांना कॅन्सर वगैरेसारख्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही. ते खरोखरच आठवड्यातील केवळ साडेतीन दिवस काम करतील, असं चित्र दिसत आहे," असं विधान जेमी यांनी मुलाखतीदरम्यान केलं. विशेष म्हणजे जे. पी. मॉर्गनने आधीच आपल्या कामाच्या ठिकाणी एआय तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली आहे. खास करुन ट्रेडिंग, रिसर्च, एरर डिटेक्शनसाठी सध्या जे. पी. मॉर्गनकडून हे तंत्रज्ञान वापरलं जात आहे. जेमी यांनी 'एआय हे तंत्रज्ञान जिवंत आणि श्वास घेणारं तंत्रज्ञान असून ते भविष्यात अधिक प्रगत होणार आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणचे नियम बदलतील,' असं नमूद केलं आहे.
नोकऱ्या जाणार नाहीत तर...
मात्र त्याचवेळी अमेरिकेतील सुप्रसिद्ध वित्तसंस्था असलेल्या 'गोल्डमन सॅक्स'ने एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात येतील अशी शक्यता यापूर्वीच व्यक्त केली आहे. एआय विकसित झाल्यानंतर जगभरातील 300 कोटी लोकांचा रोजगार बुडेल असा दावा या संस्थेनं केला आहे. मात्र जेमी हे एआयच्या भूमिकेबद्दल अधिक आशावादी आहेत. "लोकांनी शांत होण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाने कायम लोकांच्या नोकऱ्या खाल्ल्यात. मात्र याच तंत्रज्ञानाने नवीन संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. याच तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्याचा, जीवनशैलीचा दर्जा उंचावला आहे," अशी आठवण जेमी यांनी करुन दिली आहे.