मुंबई : जिओच्या फोनला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं त्यांचा नवीन स्मार्टफोन बाजारात आणळा आहे. कार्बनसोबत केलेल्या करारानंतर एअरटेलनं कार्बन A40 हा 4G फोन लॉन्च केला आहे. या फोनची किंमत १,३९९ रुपये असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरटेलचा हा स्मार्टफोन घेण्यासाठी ग्राहकांना एकूण २,८९९ रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच फोन विकत घेतल्यावर ग्राहकाला लागोपाठ ३६ महिने १६९ रुपयांचं रिचार्ज करावं लागणार आहे. लागोपाठ १८ महिने रिचार्ज केल्यावर ग्राहकाला ५०० रुपये परत मिळणार आहेत. तर ३६ महिने लागोपाठ रिचार्ज केल्यावर ग्राहकाला आणखी १ हजार रुपये मिळणार आहेत. अशाप्रकारे सुरुवातीला २,८९९ रुपये दिल्यानंतर ग्राहकाला ३६ महिन्यानंतर एकूण १,५०० रुपये परत मिळतील, म्हणजेच हा फोन ग्राहकांना १,३९९ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.


एअरटेलच्या या स्मार्टफोनमध्ये 2 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा तर 0.3 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच वाय-फाय, ब्लूटूथ, ड्युअल सिम, अॅन्ड्रॉईड नोगट ही फिचर्स फोनमध्ये उपलब्ध आहेत.


जिओनं त्यांचा स्मार्टफोन लॉन्च केला होता. या स्मार्टफोनसाठी जिओकडून १,५०० रुपयांचं डिपॉझिट घेण्यात येत आहे. ३६ महिन्यानंतर जिओ हे १५०० रुपये ग्राहकांना परत देणार आहे. जिओच्या या फोनला आता एअरटेलच्या या नव्या फोननं स्पर्धा निर्माण होणार आहे.