मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरस साऱ्या जगाच्या अर्थव्यवस्थेपुढं आणि आरोग्य यंत्रणांपुढं आव्हानं उभी करत असतानाच त्याचे थेट आणि सर्वात अधिक परिणाम दिसून आले ते म्हणजे सर्वसामान्यांच्या जीवनावर. यातच आता आणखी एका गोष्टीची भर पडत आहे, ज्यामुळं अनेकांच्या खिशाला कात्री बसण्याची चिन्हं आहेत. कोरोनाचं संकट आणि त्यामुळं लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन पाहता, मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांपुढचीही आव्हानं वाढली आहेत. परिणामी येत्या काळात या कंपन्यांकडून ग्राहकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवांचे दर वाढवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या काळात दरवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते. रिचार्जचे दर तातडीनं न वाढवल्यास ते पुढच्या काही दिवसांमध्ये वाढवले जातील अशी माहिती EY इंडियाच्या प्रशांत सिंघल यांनी दिली. दरवाढ लवकरात लवकर झाल्यास मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना याचा फायदा होणार असल्याची बाबही त्यांनी स्पष्ट केली. त्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये मोबाईल रिचार्जचे दर वाढल्यास त्यामुळं भुवया उंचावण्याची गरज नाही. सिंघल यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार दरवाढीचा पहिला टप्पा येत्या सहा महिन्यांमध्ये ग्राहकांसमोर उभा ठाकू शकतो. 


 


दूरसंचार क्षेत्रातील सध्याची परिस्थिती लाभदायक नाही. यामध्ये ऑपरेटरला योग्य परतावाही मिळत नाही. त्यामुळं टेलिकॉम सेक्टरमधील शुल्कवाढ अटळ आहे, असा इशाराही सिंघल यांनी दिला. मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये कंपन्यांकडून टॅरिफ प्लानचे दर वाढवण्यात आले होते. त्यामागोमागच आता पुन्हा एकदा ग्राहकांना मोबाईल रिचार्जच्या दरवाढीचीही झळ बसणार आहे. मुळात ही दरवाढ किती टक्क्यांनी केली जाणार आहे, हे अद्यापही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यामुळं याकडेही मोबाईल धारकांचं लक्ष लागून राहिलं आहे.