नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रभाव केवळ व्यक्तींवरच नाही तर संपूर्ण जगभरातील बाजारांवर दिसतो आहे. कोरोना व्हायरसचा परिणाम जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीवरही झाला आहे. भारतासह जगभरातील अनेक शेअर बाजारांमध्ये सध्या अनिश्चिततेचं वातावरण आहे. भारतातील सेन्सेक्स आतापर्यंतच्या सर्वात वाईट परिस्थितीत आहे. 'सीएनबीसी'ने दिलेल्या माहितीनुसार, जेफ बेजोस (Jeff Bezos) यांनी एका दिवसांत ७ अब्ज डॉलर गमावले आहेत. शेअर बाजारात आलेल्या या अनिश्चिततेमुळे जेफ बझोस यांची संपत्ती ७ अब्ज डॉलरने कमी झाली आहे. रिपोर्टनुसार, जेफ बेजोस यांची संपत्ती ११७ अब्ज डॉलरवरुन कमी होऊन ११० अब्ज डॉलर इतकी झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच नाही तर, जेफ बेजोस यांनी गेल्या महिन्यात १.८ कोटी डॉलर गमावले होते. रिपोर्टनुसार, शेअर बाजारात ही अनिश्चितता कोरोना व्हायरसमुळे आली आहे. अमेरिकेतील चार मोठ्या टेक कंपन्या - Apple, Amazon, Microsoft, Alphabet या कंपन्यांना ३२१ अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. हे नुकसान या कंपन्यांना केवळ एका दिवसांत झालं आहे. रिपोर्ट्सनुसार, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांना एका दिवसांत ४ अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे.


कोरोना व्हायरसचा टेक इंडस्ट्रीवर मोठा परिणाम होत आहे. जवळपास सर्वच टेक कंपन्यांनी यावर्षातील एक-दोन मोठे इव्हेंट रद्द केले आहेत. या व्हायरसमुळे सप्लाय चेनही बाधित होण्याबाबत रिपोर्ट्सद्वारे सांगण्यात आलं आहे. ऍपल कंपनीने या व्हायरसचा कंपनीच्या उत्पन्नावर वाईट परिणाम होण्याबाबत सांगितलं आहे. तर मायक्रोसॉफ्टनेही अशाप्रकारचे संकेत दिले आहेत. 


अमेझॉनकडून अधिकृतरित्या याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अमेरिकेत जवळपास सर्वच टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देत आहेत. गुगलनेही San Francisco आणि New York ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना व्हायरसमुळे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०२० रद्द करण्यात आला आहे.