China Taiwan Crisis 2022: चीन आणि तैवानमध्ये पुन्हा एकदा युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. चीनच्या विरोधानंतरही अमेरिकन स्पीकर नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये गेल्याने वाद चिघळला आहे. त्यामुळे चीन तैवान युद्ध होईल, अशी भीती जाणकार व्यक्त करत आहे. चीनने सहा बाजूनं तैवानची घेराबंदी केली आहे. त्याचबरोबर 4 ते 7 ऑगस्टदरम्यान मिसाईल टेस्टिंग करून लाईव्ह फायर ड्रिल केलं जाईल, असं बोललं जात आहे. चीनचा आक्रमक पवित्रा पाहून तैवानने देखील लेव्हल 2 अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे अमेरिकेनंही चीनशी दोन हात करण्याची तयारी केली आहे. अण्वस्त्रवाहू एअरक्राफ्ट जहाजांपासून ते किलर पाणबुड्या या परिसरात तैनात केल्या आहेत. यामुळे जगावर पुन्हा एकदा महागाईचं संकट घोंगावत आहे. यापूर्वी रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम संपूर्ण जगाने पाहिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीन तैवान युद्धाचा सर्वाधिक फटका ऑटो आणि मोबाईल इंडस्ट्रीला बसेल, असं तज्ज्ञ सांगत आहेत. कारण तैवानमध्ये चीप आणि सेमीकंडक्टर निर्मिती करणारे कारखाने आहेत. त्यामुळे चीप आणि सेमीकंडक्टरचा तुडवडा निर्माण होईल, आणि त्याचा परिणाम ऑटो आणि मोबाईल कंपन्यांवर होईल. सेमीकंडक्टरचा वापर इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, स्मार्टफोन आणि कार सेन्सरमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. तैवानमध्ये सेमीकंडक्टर निर्मिती उद्योग 1985 साली सुरु झाला. तैवान सरकारने 1987 मध्ये 'तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी' स्थापन केली. आज ही जगातील सर्वात मोठी सेमीकंडक्टर कंपनी आहे.


तैवानमधील संशोधन फर्म ट्रेंडफोर्सच्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये सेमीकंडक्टर उद्योगाच्या एकूण जागतिक महसुलात तैवानच्या कंपन्यांचा वाटा 60 टक्क्यांहून अधिक होता. यामध्ये टीएसएमसीने सर्वाधिक योगदान दिले आहे. टीएसएमसी ही अजूनही जगातील सर्वात मोठी सेमीकंडक्टर कंपनी आहे. ही कंपनी Apple, Qualcomm, Nvidia, Microsoft, Sony, Asus, Yamaha, Panasonic सारख्या दिग्गज कंपन्यांना पुरवठा करते. त्यामुळे जर युद्ध पेटलं तर त्याचा परिणाम ऑटो आणि मोबाईल क्षेत्रावर होईल. इतकंच काय तर मोबाईल आणि गाड्या महाग होतील.