जबरदस्त, आता रस्त्यावर धावणार Apple कार
गॅझेट्समध्ये आघाडीची अॅपल कंपनी आता कार (Apple car) उत्पादनात उतरणार आहे.
वॉशिंग्टन : गॅझेट्समध्ये आघाडीची अॅपल कंपनी आता कार (Apple car) उत्पादनात उतरणार आहे. अॅपलकडे असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाची ऑटोसेक्टरला जोड मिळणार असल्यामुळे ही कार खास असणार आहे. काय असतील अॅपल कारची वैशिष्ट्य, बघुयात. (Apple electric car)
मोबाईल आणि गॅझेट्समध्ये जगज्जेती असलेली अॅपल आता नव्या क्षेत्रात उतरणार आहे. इलेक्ट्रिक आणि ऑटोड्रिव्हन कार निर्मितीमध्ये अॅपलनं उडी घेतली आहे. (Apple electric car project) गेल्या काही महिन्यांपासून याची चर्चा होतीच. आता कंपनीनं याबाबत घोषणा केली असून ह्युंदाई आणि जनरल मोटर्सच्या प्लॅटफॉर्मवर नवी अॅपल कार तयार होणार आहे. अॅपलकडे असलेलं अद्ययावत तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, सेमीकंडक्टर्स आणि विशेषतः बॅटरीज यामुळे ही कार अन्य इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत वेगळी असणार हे निश्चित.
अवघी 10 मिनिटं बॅटरी चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल 100 किलोमीटर जाऊ शकेल, असं सांगितलं जातंय. बॅटरी फुल चार्ज असताना 500 किलोमीटरचा टप्पा कार पार करू शकेल. भारतात अॅपल कार येणार की नाही, आली तर कधी येणार हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. पण जगभरातल्या कार मेकर्ससोबत करार करून ही गाडी रस्त्यावर आणण्याचा अॅपलचा मानस आहे. त्यामुळे टाटासारख्या जुन्या, अनुभवी आणि मुख्यतः क्वालिटीकडे अधिक लक्ष देणाऱ्या कंपनीसोबत आगामी काळात करार होऊ शकतो. मात्र अॅपल कार भारतात आलीच, तर ती परवडणाऱ्या किंमतीत असेल की अॅपलच्या सर्वच गॅझेट्ससारखी महाग, हादेखील प्रश्नच आहे.
भारतातल्या गाड्या बनणार का ?
- 10 मिनिटे बॅटरी चार्ज केल्यावर गाडी 100 किमी चालेल, तर तासभर चार्ज केल्यावर 500 किमी जाईल असा दावा आहे
- हे सगळ सुरु असताना गाड्या बनवणाऱ्या भारतीय कंपन्या, टाटा सारख्या गप्प बसणार नाही
- टाटा सारख्या मातब्बर परदेशी कंपन्यांना टक्कर देतील, भारतीय ग्राहकाला योग्य किंमतीला गाडी मिळणं महत्वाचं आहे, असे मत ऑटोमोबाईल तज्ज्ञ दिलीप देसाई यांनी व्यक्त केले आहे.
अशी असणार कारची निर्मिती...
- ह्युंदाईच्या E-GMP प्लॅटफॉर्मवर अॅपल कारची निर्मिती केली जाणार आहे.
- अॅपल कारमध्ये 'लीडर' प्रणाली वापरली जाणार असल्याचं सांगितलं जातंय.
- लीडर प्रणालीमुळे कारचा आर्टिफिशियल इंटॅलिजन्स वेगळ्या पातळीवर जाईल, असं मानलं जातंय.
- अॅपल आपल्या कारमध्ये C1 चिप, A12 बायोनिक प्रोसेसर आणि इन केबिन आर्टिफिशियल इंटॅलिजन्स क्षमता देणार असल्याची माहिती आहे.
कार रस्त्यावर यायला आणखी काही वर्ष जाणार आहेत. मात्र ऑटोप्रेमींमध्ये कारबाबत आतापासूनच उत्सुकता आहे. कारण अॅपलच्या अन्य उत्पादनांसारखीच अॅपल कारही खास असेल, याची त्यांना खात्री आहे.