मुंबई : बिलांचं ऑटो पेमेंट किंवा डेबिटसंदर्भात उद्यापासून लागू होणाऱ्या नियमाला आता ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा आदेश जारी केला आहे. लोकांना या निर्णयामुळे होणाऱ्या गैरसोयीमुळे काही काळासाठी निर्णय पुढे ढकलण्यात आल्याचे आरबीआयने म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणणं आहे रिझर्व्ह बँकेचे?
काही स्टेकहोल्डरर्सनी नवा नियम लागू करायला आणखी वेळ मागितला आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होईल. त्यामुळे ग्राहकांच्या हितासाठी हा निर्णय आता ३० सप्टेंबर, २०२१ पर्यंत पुढे ढकलला आहे. 


कोणता नियम १ एप्रिलपासून लागू होणार होता? 
ऑटोमॅटिक सिस्टिमनुसार होणारे पेमेंट, ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी लागणारे सबस्क्रिप्शन चार्ज, रेंटल सुविधा यासाठी तुमचे बँक खाते लिंक केले की ऑटो पेमेंट होत असे. आरबीआयच्या नव्या नियमांनुसार बँकांना पेमेंटच्या तारखेच्या 5 दिवस आधी अधिसूचना पाठवावी लागेल. ग्राहकाने मंजूरी दिली तरच पेमेंट मंजूर होईल. जर रिकरिंग पेमेंट 5000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर बँकांना ग्राहकांना वन-टाइम पासवर्ड (OTP) पाठवावा लागेल. ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करता आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.


ग्राहकांना याबाबत माहिती मिळण्यासाठी अनेक बँकांनी ग्राहकांना SMS किंवा ई-मेलद्वारे माहिती दिली. मात्र अनेक बँका अशाप्रकारची प्रक्रीया राबवण्यासाठी तयार नसल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे अशी शक्यता होती की, ग्राहकांना व्यवहार करताना अडचणी येतील. 


म्हणूनच यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ६ महिन्यांची मुदतवाढ करून आता हा नियम ३० सप्टेंबर, २०२१ पासून लागू करण्याचे ठरविले आहे.