ऑलेक्ट्राची शेअर बाजारात उसळी, कंपनीची तिसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी
Auto News : इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेकने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. नफ्यात 78 टक्क्यांची मोठी झेप नोंदवली गेली आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक आहे ज्याने 1 वर्षात गुंतवणूकदारांना 250 टक्के परतावा दिला आहे.
मुंबई : इ शिवनेरी पुरवणाऱ्या आणि एसटीची 5150 तसंच बेस्टची 2100 बसेसची ऑर्डर मिळवणाऱ्या ऑलेक्ट्रा ग्रिनटेकचा तिसऱ्या तिमाहीचा निकाल कंपनीने जाहिर केलाय. आघाडीची इलेक्ट्रिक बस आणि ट्रकच्या उत्पादक कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OGL) ने 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिसऱ्या आणि आतापर्यंतच्या नऊ महिन्यांचे एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले. या तिमाहीत, ऑलेक्ट्राने 178 इलेक्ट्रिक वाहने वितरित केली, 2022-23 मध्ये वितरित केलेल्या 142 च्या तुलनेत वितरणात वाढ 25 टक्के एवढी झाली.
आर्थिक वर्ष 23-24 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी महसूल 33% ने वाढून 342.14 कोटी रुपये इतका झाला कंपनीने आजपर्यंत 1615 इलेक्ट्रिक वाहने वितरीत केली आहेत. 8,088 एवढी एकूण बस ऑर्डर्स कंपनीकडे आजमीतीला आहेत. कंपनीने 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी 7.69 रुपये प्रति शेअर कमाई (EPS) नोंदवली, 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या मागील नऊ महिन्यांसाठी ती 4.70 रुपये होती.
निकालांवर भाष्य करताना, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक के. व्ही. प्रदीप म्हणाले, 'आमची उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान क्षमता वाढवण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. आमच्याकडे एक चांगली ऑर्डर बुकींग देखील आहे.' सीतारामपूर येथे नव्या कारखान्याचे 150 एकरांवर बांधकाम सुरू आहे आणि आम्ही फेब्रुवारी 2024 मध्ये या नवीन सुविधेतून काही प्रमाणात उत्पादन सुरू करत आहोत. या कारखान्यामुळे आमची उत्पादन क्षमता आणखी वाढेल, असंही ते म्हणाले.
कंपनीची ठळक वैशिष्ट्य
वित्तीय वर्ष 23-24 च्या 3 ऱ्या तिमाहीत रु. 27.11 कोटीचा विक्रमी निव्वळ नफा, मागच्या तिमहीच्या तुलनेत 77% जास्त नफ्याची नोंद
2022-23 मध्ये वितरित झालेल्या 142 इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत 2023-24 मध्ये 178 इलेक्ट्रिक वाहनांचे वितरण
EBITDA 52% ने वाढला
आर्थिक वर्ष 23-24 मध्ये PAT मध्ये 77% ची उल्लेखनीय वाढ