एटीएम ट्रान्झक्शन फेल आणि तरीही पैसे कापले गेले... बँक देणार भरपाई
ग्राहकांनो तुम्हाला हे माहीत आहे का की जर बँकेनं रिफंड करण्यात उशीर केला तर तुम्हाला बँकेकडूनही दंड वसूल करण्याचा हक्क आहे
नवी दिल्ली : बऱ्याचदा तुम्ही एखाद्या ठिकाणी एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाता आणि काहीतरी कारणानं पैसे बाहेर येत नाहीत. हे एटीएम ट्रान्झक्शन फेल जातं. परंतु, थोड्याच वेळात तुमच्या मोबाईलवर पैसे कापले गेल्याचा मॅसेज येतो... मग ते पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला वेगळी धडपड करावी लागते. बऱ्याचदा अशावेळी पैसे बँकेकडून रिफंड केले जातात. तर अनेकदा कस्टमर केअरला फोन किंवा मेल करून तक्रार दाखल करावी लागते. त्यानंतर काही दिवसांनी तुमचे पैसे तुम्हाला रिफंड केले जातात. आरबीआयच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०१८ (२०१७-२०१८) मध्ये अशा पद्धतीचे जवळपास १६ हजार तक्रारींची नोंद झालीय. परंतु, ग्राहकांनो तुम्हाला हे माहीत आहे का की जर बँकेनं रिफंड करण्यात उशीर केला तर तुम्हाला बँकेकडूनही दंड वसूल करण्याचा हक्क आहे.
आरबीआयच्या नियमांनुसार, ज्या दिवशी तुम्ही फेल ट्रान्झक्शनची तक्रार दाखल करता त्यानंतर सात दिवसांत (वर्किंग डे) तुम्हाला जर रिफंड मिळाला नाही तर बँक प्रती दिवसासाठी १०० रुपयांच्या हिशोबानं तुम्हाला दंड भरेल.
जाणून घ्या आरबीआयचे नियम
- जर तुमच्यासोबत असं कधी घडलं आणि पैसे हातात न मिळताही तुमच्या अकाऊंटमधून पैसे कापले गेले तर त्याची सर्वप्रथम तक्रार दाखल करा. ज्या बँकेनं तुम्हाला हे कार्ड दिलंय त्या बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क करा
- तुम्ही कोणत्या एटीएममधून ट्रान्झक्शन केलंय त्याचा कोणताही फरक पडत नाही
- फेल ट्रान्झक्शन होऊनही अकाऊंटमधून पैसे कापले गेले तर बँकेला सात दिवसांच्या आत तुम्हाला रिफंड द्यावा लागेल
- तुम्ही तक्रार दाखल केली नसेल तरीदेखील बँक तुम्हाला रिफंड करण्यासाठी बांधिल असेल
- तुम्हाला तक्रार दाखल करायची असेल तर ३० दिवसांच्या आत तुम्हाला हे काम करावं लागेल. अनेकदा २४ तासांच्या आत ग्राहकांना रिफंड केला जातो