नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की, क्रिप्टो करन्सी चोरी होत नाही. मात्र, हॅकर्सने बिटकॉईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कॉईनसिक्युअरला तब्बल १९ कोटींचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीने ४३८ बिटकॉईन चोरी झाल्याची माहिती दिली आहे, याची किंमत जवळपास १९ कोटींच्या घरात आहे. हे क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन वॉलेटमधून चोरी झाली आहे.


चोरीची सर्वात मोठी घटना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीचे सीईओ मोहित कालरा यांनी सांगितले की, ही चोरी करण्यामागे कंपनीमधीलच एखाद्या व्यक्तीचा हात असण्याची शक्यता आहे. क्रिप्टोकरन्सी चोरी होण्याची ही सर्वात मोठी घटना असल्याचं बोललं जात आहे.


आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल


दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल अधिकाऱ्यांनी क्रिप्टोकरन्सी चोरी प्रकरणावर म्हटलं की, कॉईनसिक्युअर नावाची क्रिप्टोकरन्सी फर्मने चोरी झाल्याचं कळवलं. या चोरी प्रकरणी आयपीसी आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


कॉईनसिक्युअरचे २ लाख यूजर्स


कॉईनसिक्युअरचे देशभरात जवळपास २ लाखांहून अधिक युजर्स आहेत. कंपनीने पोलिसांना माहिती दिली की, ज्यावेळी सर्व वॉलेट तपासले जात होते त्यावेळी चोरी झाल्याचं समोर आलं. जे बिटकॉइन ऑफलाईन करण्यात आले होते ते सर्व बिटकॉईन गायब झाल्याचं तपासात समोर आलं. तसेच, वॉलेटच्या प्रायव्हेट कीज म्हणजेच पासवर्डही ऑनलाईन लीक झाले आहेत.


कॉईनसिक्युअर तर्फे गुरुवारी आपल्या युजर्सला वेबसाईटवर मेसेज पोस्ट करत हॅकिंग संदर्भात माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या सर्व्हरला सीज केलं आहे जेणेकरुन हॅकिंग संदर्भात माहिती मिळू शकेल.