नवी दिल्ली : 'भारत संचार निगम लिमिटेड'ने (BSNL) १५१ रुपयांचा नवीन प्लान लॉन्च केला आहे. या प्लानला भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे नाव देण्यात आले आहे. 'Abhinandan 151' अशा नावाने प्लान लॉन्च करण्यात आला आहे. या प्लानची वैधता २४ दिवस इतकी आहे. या प्लानमध्ये यूजर्सना दररोज १ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळणार आहेत. २४ दिवसांपर्यंत लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल मोफत देण्यात आले आहेत. २४ दिवसांनंतर १८० दिवसांसाठी इनकमिंग सुविधा मोफत देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा प्लान सबस्क्राईब करण्यासाठी बीएसएनएल यूजर्सनी आपल्या फोनवरुन PLAN 151 टाईप करुन तो १२३ वर सेंड केल्यास या प्लानची सुविधा लागू होईल. हा प्लान चेन्नई आणि तमिळनाडू भागासाठी लॉन्च करण्यात आला आहे. परंतु दिल्ली आणि मुंबईतील वापरकर्तेही या प्लानचा फायदा घेऊ शकतात. 


बालाकोट येथील एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान सैन्य दलाच्या एफ- १६ विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या एफ १६ या विमानांना परतवून लावताना त्यांच्यावर भारताकडूनही हल्लाबोल करण्यात आला. याच कारवाईत भारतीय वायुदलाच्या मिग-२१ या विमानावर पाकिस्तानकडून निशाणा साधला गेला. विंग कमांडर अभिनंदन यांच्या हाती मिगची जबाबदारी होती, त्यांनीही पाकिस्तानच्या एफ-१६ ला दणका दिला होता. पण, अभिनंदन यांच्या लढाई विमानावर मारा झाल्यामुळे ते मिग अपघातग्रस्त झालं. या कारवाईदरम्यान पाकिस्तान सैन्यदलाने ते ताब्यात घेतलं. त्यानंतर १ मार्च रोजी अभिनंदन यांना भारताकडे सोपवण्यात आलं.