Free iPhone 15 : अ‍ॅपल कंपनीने त्यांच्या बहुप्रतीक्षित आयफोन 15 ची विक्री सुरु केली आहे. भारतासहीत जगभरातील अनेक देशांमध्ये हा फोन शुक्रवारपासून म्हणजेच 22 सप्टेंबर 2023 पासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. आयफोन 15 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ दिसत असून विक्रीच्या पहिल्याच दिवशी आयफोन प्रेमींनी अ‍ॅपल स्टोअरबाहेर लांबच्या लांब रांगा लावल्याचं पाहायला मिळालं. अगदी मुंबईतील बीकेसीमध्ये असलेल्या भारतामधील एकमेव अ‍ॅपल स्टोअरबाहेरही भारतीयांनी नवीन आयफोन घेण्यासाठी, बुक करण्यासाठी रांग लावल्याचं दिसलं. मात्र आयफोनची हीच क्रेझ पाहून सायबर गुन्हेगारही या माध्यमातून फसवणूक करत असल्याचं दिसत आहे.


आयफोन 15 चं आमिष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयफोन 15 च्या नावाने फसवणूक करण्यासाठी आता भारतीय पोस्ट विभागाच्या नावाचा गैरवापर केला जात आहे. 'Congratulation! Your prize iPhone 15. Click on...' अशापद्धतीने सुरु होणारा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. या मेसेजच्या माध्यमातून पोस्टाच्या नावाने लोकांना आयफोन 15 चं आमिष दाखवत फसवणूक केली जात आहे. याची दखल भारतीय पोस्टानेही घेतली आहे. आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचं ट्वीटर) हॅण्डलवरुन याबद्दलचं स्पष्टीकरण पोस्ट करुन अशाप्रकारे सायबर चोर भारतीय पोस्टच्या नावाचा गैरवापर करुन फसवणूक करत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळेच कोणी तुम्हालाही मोफत आयफोन 15 चं आमिष दाखवत असेल तर वेळीच सावध व्हा. असे मेसेज लोकांना आर्थिक गंडा घालण्यासाठी, त्यांची खासगी माहिती चोरण्यासाठी वापरले जात आहेत. 


पोस्टाने नेमकं काय म्हटलंय?


भारतीय पोस्टाने त्यांच्या सोशल मीडियावरुन केलेल्या पोस्टमध्ये, लकी विजेता मेसेजच्या पोस्टला 5 ग्रुप आणि 20 मित्रांबरोबर शेअर करुन आयफोन 15 जिंकू शकतो. या पोस्टच्या मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करुन तुम्ही तुमच्या आयफोनसाठी दावा करु शकता असं मेसेजमध्ये म्हटलं आहे. हाच व्हायरल पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत पोस्टाने नागरिकांना आव्हान केलं आहे. 'कृपया सावध राहा! भारतीय पोस्ट कोणत्याही अनौपचारिक पोर्टल किंवा लिंकच्या माध्यमातून कोणत्याही भेटवस्तूंची वाटप करत नाही. भारतीय पोस्ट खात्यासंबंधाची माहिती जाणून घेण्यासाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी,' असं आवाहन पोस्टाने केलं आहे.



मालवेअर डिव्हाइज करतात इन्फेक्टेड


अशा व्हायरल लिंक्सच्या माध्यमातून लोकांच्या बँक खात्यांवर डल्ला मारण्याचं काम सायबर चोर करतात. या लिंक्सबरोबर मालवेअरही असतात. लिंकवर क्लिक करताच मालवेअर फोन अथवा कंप्युटरला बाधित करतो. त्यानंतर हे मालवेअर युझर्सची महत्त्वाची माहिती स्कॅमर्सला पुरवतात. किंवा अशा लिंकच्या माध्यमातून युझर्सला काही विशिष्ट वेबसाईट्सवर रिडायरेक्ट केलं जातं. या वेबसाईटवरुन युझर्सची खासगी माहिती चोरली जाते.