मुंबई : Cyber Fraud:जराशी चूक तुम्हाला चांगलीच महाग पडू शकते हे मुंबईतील एका घटनेवरुन दिसून आले आहे. PAN अपडेट करण्यासाठी मोबाईलवर लिंक आली, क्लिक केल्यावर खात्यातून तात्काळ 1.80 लाख काढण्यात आले. त्यामुळे मोबाईलवर आलेली कोणतीही लिंक तात्काळ क्लिक करु नका, अन्यथा डोक्याला हात लावण्याची वेळ तुमच्यावर येईल. थोडीशा सावधनता बाळगा. (Cyber Fraud in Mumbai) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पॅन अपडेट करण्यासाठी लिंकवर क्लिक केल्यानंतर खात्यातून 1.80 लाख रुपये काढले गेले. मात्र, अशी फसवणूक कशी टाळायची ते जाणून घ्या. (How to Avoid Cyber Fraud)मुंबईतील एका खासगी कंपनीत अकाउंट ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या 34 वर्षीय महिलेच्या खात्यातून सायबर हॅकरने 1 लाख 80 हजार रुपये काढून घेतले. हे काम करण्यासाठी हॅकरने फिशिंग लिंकचा वापर केला. महिलेने त्या लिंकवर क्लिक करताच तिच्या फोनचा ताबा हॅकरच्या हातात गेला आणि त्यांने तात्काळ खात्यातील सर्व पैसे काढून घेतले.


महिलेने 16 मे रोजी तक्रार केली


याप्रकरणी पीडितेने 16 मे रोजी मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, ती 9 मे रोजी विलेपार्ले (पश्चिम) येथील तिच्या कार्यालयात काम करत होती. त्याचवेळी त्यांच्या फोनवर लिंक असलेला टेक्स्ट मेसेज आला. या मेसेजमध्ये त्यांना त्यांचे पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगितले होते.


बनावट लिंकवर क्लिक केले


बँकेचा मेसेज समजून महिलेने लिंकवर क्लिक केले. असे केल्याने एचडीएफसी बँकेचे बनावट वेबपेज उघडले. तेथे त्यांना त्यांचा यूजर आयडी आणि पासवर्ड टाकण्यास सांगण्यात आले. त्या दोन्ही गोष्टी तिने टाकल्यावर त्यांच्या फोनवर वन टाईम पासवर्ड (OTP) आला. यानंतर त्यांना ओटीपी आणि पॅन क्रमांकाची माहिती देण्यास सांगण्यात आले.


खात्यातून 1.80 लाख रुपये काढले


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तिचा ओटीपी आणि पॅन कार्ड तपशील टाकताच तिच्या बँक खात्यातून 1.80 लाख रुपये काढण्यात आले. तिच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्याने महिलेला धक्का बसला आणि ती घाबरुन गेली. त्यांनी बँकेत फोन करून खाते ब्लॉक केले आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 419, 420, 66C (ओळख चोरी )आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 66D अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


कोणत्याही लिंकवर कधीही क्लिक करु नका


पोलिस अधिकार्‍यांच्या मते, सायबर फसवणुकीच्या  (Cyber ​​Fraud)अशा प्रकरणांमध्ये यूजर्सचा निष्काळजीपणा हे सर्वात मोठे कारण आहे. कोणतीही बँक पॅन किंवा आधार अपडेट करण्यासाठी फोनवर अशी लिंक पाठवत नाही किंवा कोणाला कॉलही करत नाही, याचीही त्यांना जाणीव नाही. असा कॉल किंवा मेसेज कोठूनही लिंक आल्यास, तुम्हाला सायबर फसवणुकीत अडकवले जात आहे, असे समजावे.


चुकूनही OTP दुसऱ्याला सांगू नका


पोलिसांच्या मते, कोणत्याही प्रकारची आकर्षक करणारी लिंक कधीही क्लिक करु नये. असे केल्याने तुमच्या फोनचा ताबा तुमच्या हातातून जाऊ शकतो. जरी ती क्लिक झाली तरी, ताबडतोब त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि फोन रिस्टार्ट करा. तसेच, तुमचा ओटीपी चुकूनही कोणालाही सांगू नका. या OTP द्वारे तुमच्या खात्यातून पैसे काढता येतात.