ट्विटरमध्येही एडिटचा पर्याय उपलब्ध होणार !
नवी दिल्ली: मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर युजर्सने केलेले ट्विट त्याला एडिट करता येणार आहे. याआधी युजर्सला ट्विट एडिट करण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. ट्विट एडिट करता यावे म्हणून कंपनी नवीन फिचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ट्विटरच्या या फिचरद्वारे युजर्सचे एडिट केलेले ट्विट इतरांना दिसेल. त्याच बरोबर अगोदर केलेले मूळ ट्विटही दिसणार आहे.
ट्विटरचे संचालक जॅक डोर्से यांनी सांगितले की, ट्विट एडिट करण्यासाठी आम्ही एक फिचर घेऊन येणार आहोत. त्याने युजर्सला मोठा फायदा होऊ शकतो. ट्विट एडिट करण्यासाठी युजर्सकडे ५ ते ३० सेकंदाचा कालावधी देण्यात येणार आहे. युजर्सला ट्विट एडिट करण्यासाठी ३० सेकंदाचा वेळ मिळणार आहे. परंतु, ३० सेकंदाचा वेळ संपल्यानंतर युजर्सला ट्विट एडिट करणे अशक्य होणार आहे. आतापर्यंत हे फिचर का नव्हते? या प्रश्नाचे उत्तर देताना डोर्से म्हणाले की, ट्विटरची निर्मिती SMS म्हणजेच मेसेजच्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे. एकदा मेसेज पाठवल्यानंतर तो रद्द करता येत नाही. त्याचप्रमाणे एकदा ट्विट केल्यानंतर ते ट्विट जगभरात पोहोचते. काही वर्षांपासून ट्विटरमध्ये एडिटचे पर्याय उपलब्ध करुन द्या, अशी अनेकांची मागणी होती. हे फिचर सुरु झाल्यावर युजर्सला मोठा दिलासा मिळणार आहे. कारण, ट्विटरमध्ये पहिल्यांदाच युजर्ससमोर एडिटचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.