Electric Two Wheeler Refund: भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicles) मागणीच प्रचंड वाढ झाली आहे. ग्राहकांकडून चारचाकीच्या तुलनेत दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांना खरेदी करण्यास जास्त पसंती दिली जात आहे. गेल्या काही महिन्यातील आकडेवारी पाहिली तर भारतीयांनी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक दुचाकींची खरेदी केल्याचं दिसत आहे. दरम्यान, या इलेक्ट्रिक दुचाकींच्या मालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांना कंपन्या पैसे रिफंड करणार आहेत. हे पैसे इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करताना आकारण्यात आलेल्या चार्जरसाठीचे आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओला इलेक्ट्रिक (Ola Electric), हिरो मोटोकॉर्प (Hero Motocorp), एथर एनर्जी (Ather Energy) आणि टीव्हीएस मोटर (TVS Motors) या प्रमुख इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री करणाऱ्या कंपन्यांनी ईव्ही ऑफ - बोर्ड चार्जरसाठी आकारण्यात आलेले पैसे ग्राहकांना परत म्हणजेच रिफंड करण्याची योजना आखली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही रक्कम 288 कोटींच्या आसपास आहे. यासाठी काही कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे. 


Ola Electric ने सोशल मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक दुचाकीसाठी आकारण्यात आलेले चार्जरचे पैसे ग्राहकांना परत करणार असल्याची घोषणा केली आहे. योग्य ग्राहकांनाच हे पैसे परत देणार असल्याचं ओलाने सांगितलं आहे. मात्र त्यांनी यामध्ये नेमकी किती रक्कम रिफंड करणार आहे यासंबंधी काही माहिती दिलेली नाही. पण मिंटच्या एका रिपोर्टनुसार, ओला ग्राहकांना तब्बल 130 कोटी रुपये परत करणार आहे.



फक्त Ola Electric च नाही, तर अथर एनर्जी जवळपास 140 कोटी, टीव्हीएस मोर्टर्स iQube ग्राहकांना जवळपास 15.61 कोटी, हिरो मोटोकॉर्प आपल्या Vida V1 Plus इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना 2.23 कोटी परत करणार आहे. एथर एनर्जी 12 एप्रिलपर्यंत विक्री झालेल्या दुचाकींचं रिफंड देणार आहे. तर टीव्हीएस मोर्टस आणि हिरो मोटोकॉर्प 23 मार्चपर्यंत विकण्यात आलेल्या गाड्यांवर रिफंड देणार आहे. 


पण रिफंड कशासाठी?


इलेक्टिक दुचारी निर्माता कंपन्या आपल्या वाहनांवर ग्राहकांना सब्सिडी देण्यासाठी ईव्ही चार्जरची किंमत वेगळ्याने आकारत होती. ओकिनावा ऑटोटेक आणि हिरो इलेक्ट्रिककडून FAME II योजनच्या नियमांचं उल्लंघन केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं. कंपन्यांकडून सुरु असलेला हा गैरकारभार समोर आल्यानंतर केंद्र सरकारने त्यांना FAME चा फायदा देणं बंद केलं होतं. इतकंच नाही तर सब्सिडी मिळवण्यासाठी पात्र असल्याचं नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 


काय आहे नियम?


FAME II नियमांतर्गत, ज्या इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपन्या 1.5 लाख (एक्स-शोरुम) रिटेल किंमतीवर गाडीची विक्री करतात त्या सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या 10 हजार कोटींच्या योजनेसाठी पात्र नाहीत. पण तपासात समोर आलं की, ओला, एथर, टीव्हीएस मोटर आणि हिरो विडा यांनी सब्सिडी मिळवण्यासाठी आपल्या वाहनांची चुकीची किंमत ठेवली होती. एमएचआयच्या माहितीनुसार, एक्स शोरुममध्ये किंमत कमी ठेवण्यासाठी आणि सब्सिडी मिळवण्यासाटी या कंपन्या चार्जर आणि सॉफ्टवेअरचं वेगळं बिल लावत होते. 


दरम्यान यानंतर हीरो मोटोकॉर्पने आपल्या Vida V1 Plus आणि V1 Pro रेंज इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती कमी केल्या आहेत. Vida V1 Plus ची किंमत 25 हजार तर V1 Pro ची किंमत 19 हजारांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे या गाड्या आता 1.2 आणि 1.4 लाख किंमतीत उपलब्द आहे.