वॉशिंग्टन : सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या 'फेक न्यूज'वर बरीच चर्चा झाली... त्यानंतर फेसबुकनं अशा 'फेस न्यूज'वर नियंत्रण मिळवण्यासाठी काही उपाययोजनाही केल्या. परंतु, आता फेसबुकनं स्वत:च्याच एका 'न्यूज टॅब'वर काम सुरू केलंय. फेसबुकचा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यानं मंगळवारी ही माहिती दिलीय. 'उच्च गुणवत्ता आणि विश्वसनीय' पत्रकारितेला आर्थिक रुपात समर्थन देण्यासाठी फेसबुकच्या या न्यूज टॅबचा वापर केला जाऊ शकतो, असं झुकरबर्गनं म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झुकरबर्गनं माथियास डॉफनर आणि जर्मनीचे मीडिया दिग्गज एक्सल स्प्रिंगर यांच्यासोबत 'तंत्रज्ञान आणि समाजाचं भविष्य' या विषयावर एका व्हिडिओ चर्चेदरम्यान ही माहिती दिलीय. 


विश्वसनीय बातम्यांची अपेक्षा असणाऱ्या युझर्सच्या मदतीसाठी हे एक वेगळं डिजिटल उत्पादन असेल, असंही झुकरबर्गनं म्हटलंय. उच्च गुणवत्ता आणि विश्वसनीय माहिती समोर आणण्यासाठी याचा वापर होईल, अशी आशा त्यानं यावेळी व्यक्त केली.


एकूण फेसबुक युझर्सपैंकी १० ते १५ टक्के युझर्स 'न्यूज टॅब'मध्ये रुची असणारे आहेत. यामध्ये आम्ही पत्रकारांनी रचलेल्या बातम्या दाखवणार नाहीत. तसंच याद्वारे फेसबुक शक्यतो थेट प्रकाशकांसोबत संबंध प्रस्थापित करू शकतो, असंही झुकरबर्गनं म्हटलंय.