फेसबुकचे शेअर्स कोसळलेत, झुकरबर्गला मोठा झटका
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला मोठा झटका बसला.
वॉशिंग्टन : शेअर बाजारातून आज मोठी बातमी आली. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला मोठा झटका बसला. फेसबुकचे शेअर्स आज कोसळलेत. त्यामुळे मार्क झुकरबर्गला १६.८ अब्ज डॉलर्सचा फटका बसलाय. त्यामुळे त्याची श्रीमंतही खाली आहे.
फेसबुक शेअर्सची शेअर बाजारात मोठी पडझट पाहायला मिळाली. अवघ्या दोन तासांमध्ये फेसबुकच्या शेअरचा भाव २० टक्क्यांनी खाली आला. त्यामुळे मार्क झुकरबर्गची श्रीमंती तब्बल १६.८ अब्ज डॉलर्सनी कमी झाली. आता मार्क झुकरबर्गच्या ताब्यात असलेल्या शेअर्सचे बाजारमूल्य सुमारे ७० अब्ज डॉलर्स आहे. जे बुधवारी सकाळी ८४ अब्ज डॉलर्सच्या जवळपास होते.
मार्क झुकरबर्गला १६.८ अब्ज डॉलर्सचा मोठा फटका बसल्याने त्याचे दिवाळे निघाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मार्क झुकरबर्गसाठी ही रक्कम त्याच्या संपत्तीच्या एक पंचमांश आहे. बुधवारी मात्र फेसबुकने दुसऱ्या तिमाहीचे निकाल सांगितले. अपेक्षेएवढी वाढ फेसबुकला साधता आलेली नाही. हे जसे स्पष्ट झाले त्याचप्रमाणे येत्या सहा महिन्यांमधली उत्पन्नाची वाढही अपेक्षेएवढ्या गतीने वाढणार नसल्याचे समोर आले. त्यानंतर शेअरच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली.
अचानक असं काय झालं आणि फेसबुकच्या उत्पन्नासंदर्भातले अंदाज इतके कसे चुकले, असे तज्ज्ञांनी म्हटलेय. माहितीसंदर्भात विविध देशांमध्ये बदलत असलेले कायदे, श्रीलंका व म्यानमारमध्ये चुकीची माहिती पसरवली गेली आणि त्यामुळे झालेले दंगे, घटणारे किंवा अपेक्षेइतके न वाढणारे युजर्स या सगळ्यांची पार्श्वभूमी फेसबुकच्या घसरणीला कारणीभूत आहे.
फेसबुकवर लोक विश्वासाने देत असलेली माहिती किती सांभाळली जाते, तिचे रक्षण केले जाते ना, जाहिरातदारांसाठी काय नियम आहेत या आणि अशा अनेक प्रश्नांवरून गेली काही वर्षे फेसबुकवर टीका होत आहे. परंतु आत्तापर्यंत याचा परिणाम फेसबुकच्या उत्पन्नावर झाला नव्हता. मात्र, आता थेट परिणाम झाल्याने शेअर बाजारात फेसबुकला मोठा फटका बसलाय. फेसबुकच्या रोजच्या अॅक्टिव्ह युजर्सची संख्या जूनमध्ये १.४७ अब्ज असून ती ही स्थिर आहे. यामुळे फेसबुक आता यापेक्षा वाढणार नाही की काय अशी चिंता गुंतवणूकदारांना लागली आहे. त्यामुळेच फेसबुकला शेअर्सच्या विक्रीचा तडाखा बसला.