महिला बॉसने केली शरीरसुखाची मागणी, नकार दिल्यानंतर...; Google च्या कर्मचाऱ्याचा आरोप
Google Employee Claims Sexual Harassment: गुगलच्या कर्मचाऱ्याने कंपनीमध्ये देण्यात आलेल्या वागणुकीसंदर्भात काही धक्कादायक दावे करत याप्रकरणी याचिकाच दाखल केली आहे.
Google Employee Claims Sexual Harassment: माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी सेक्टरमधील जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेली कंपनी म्हणजे गुगल (Google). सध्या कर्मचारी कपातीमुळे (job cuts) गुगल चर्चेत असतानाच कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने कंपनीविरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. या कर्मचाऱ्याने कंपनीमधील लैंगिक शोषणासंदर्भात (Sexual Harassment) धक्कादायक आरोप केले आहेत. कंपनीने आयोजित केलेल्या डिनर पार्टीदरम्यान एका महिला बॉसचं म्हणणं ऐकलं नाही म्हणून मला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं, असा या कर्मचाऱ्याचा आरोप आहे.
काय म्हटलंय कर्मचाऱ्याने?
दाखल केलेल्या याचिकेनुसार, एका उच्चपदस्थ महिला कर्मचाऱ्याने या पुरुष कर्मचाऱ्याकडे लैंगिक सुखाची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न केल्याने आपल्याला कामावरुन काढून टाकण्यात आल्याचा आरोप या कर्मचाऱ्याने केला आहे. संबंधित घटना डिसेंबर 2019 मध्ये मॅनहॅटन येथील रेस्तराँरंटमधील पार्टीदरम्यान घडल्याचं याचिकेत म्हटलं आहे. माजी कर्मचाऱ्याने 'लैंगिक छळ, लैंगिक भेदभाव, वंशवाद आणि द्वेषपूर्ण वागणूक' या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागल्या असं म्हटलं आहे. ज्या कार्मचाऱ्याने हे आरोप केलेत तो गुगलमधील अन्न पदार्थ, शितपेय आणि रेस्तराँरंट डिव्हीजनमध्ये सीनियर एक्झीक्युटीव्ह पदावर कामाला होता. ज्या महिलेवर हे आरोप करण्यात आले आहेत ती सुद्धा कंपनीवर वरिष्ठ पदावर होती. ती गुगल कंझ्युमर गव्हर्मेंट आणि एन्टर्टेनमेंट विभागामध्ये प्रोग्रामॅटिक मीडियाशी संबंधित उच्चपदस्थ अधिकारी होती.
कारण काय देण्यात आलं?
गुगलच्या या माजी कर्मचाऱ्याने या महिलेने दिलेली वागणूक फारच वाईट होती. तिच्याकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे आपल्याला फार त्रास होत होता. यासंदर्भात या व्यक्तीने ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटकडे अधिकृतपणे तक्रार केल्यानंतरही या महिलेविरोधात कारवाई करण्यात आली नाही असंही म्हटलं आहे. आपल्याला मागील वर्षी ऑगस्टमध्ये गुगलच्या नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. नोकरीवरुन काढून टाकताना, 'तो इनक्युजिव नव्हता,' म्हणजेच सर्वांशी मिळून मिसळून राहणारा नव्हता असं सांगण्यात आलं होतं.
कंपनीचं म्हणणं काय?
संबंधित महिलेने आपल्या माजी सहकाऱ्याकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. कंपनीच्या प्रवक्त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियामध्ये ही याचिका खोट्या माहितीच्या आधारे दाखल करण्यात आली आहे. कंपनीवर नाराज असलेल्या एका माजी कर्मचाऱ्याने ही याचिका दाखल केल्याचं गुगलने म्हटलं आहे.
गुगलमधून कर्मचारी कपात
याच महिन्याच्या सुरुवातीलाच गुगलने मोठ्याप्रमाणात कर्मचारी कपात केल्याच्या बातम्या समोर आल्या. गुगलची मातृक कंपनी असलेल्या अल्फाबेटने जगभरामधील जवळजवळ 12 हजार कर्मचाऱ्यांना (12,000 job cuts) कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला. ही संख्या कंपनीमधील एकूण कर्मचारी संख्येच्या ही सहा टक्के आहे. कंपनीच्या 25 वर्षांच्या इतिहासामधील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाईंनी कंपनी या निर्णयाची पूर्ण जबाबदारी मी घेत आहे, असं सांगितलं. कंपनी कामावरुन काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना मदत करेल असंही पिचाई म्हणाले.