स्वस्तात मस्त विमान तिकीट बुक करण्यासाठी Google करणार मदत, दर कमी झाल्यास पैसेही परत देणार
Google Flight Tickets : एखाद्या ठिकाणा फिरायला जाण्याचा बेत आखताय? गुगलची ही नवी सेवा आणि पैसेही परत देण्याची सुविधा एकदा पाहाच. कारण हे फिचर तुमचा प्रवास स्वस्तच नव्हे तर तितकाच मस्तही करणार आहे.
Google Flight Tickets : एखाद्या ठिकाणी (Travel) फिरण्यासाठी जाण्याचा बेत आखला जातो तेव्हा देशांतर्गत प्रवासासाठी सहसा आपण रेल्वेला प्राधान्य देतो. पण, विषय जेव्हा वेळ वाचवण्याचा येतो तेव्हा मात्र अनेकांचीच पसंती विमान प्रवासाला असते. अवघ्या काही तासांत एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचं स्वातंत्र्य विमान प्रवासामुळं मिळतं. त्यामुळं वेळेची बचत होते आणि आपल्याला एखाद्या ठिकाणी जास्त वेळही देता येतो. पण, इच्छा असूनही काही मंडळींना विमान प्रवास करता येत नाही. कारण असतं ते म्हणजे विमान तिकीटांचे दर.
कमीत कमी अंतरापासून जास्तीत जास्त अंतरावर जाण्यासाठी जेव्हा विमान तिकीटाच्या बुकींगसाठी आपण एखाद्या वेबसाईटवर भेट देतो तेव्हा तिथं असणारे दर पाहून डोकं चक्रावतं. अनेकदा तर, (Delhi) दिल्लीपर्यंत विमानानं जाण्यासाठीचे दरही 9 ते 10 हजारांच्या घरात असतात. अशा वेळी सराईत मंडळी काही शकला लढवून कमीत कमी किंमतीला हे तिकीट कसं मिळेल याचेच प्रयत्न करताना दिसतात.
क्रेडिट कार्ड (Credit Card), डेबिट कार्ड (Debit Card), एखादं कुपन (Cupon), एखादा शॉपिंग कोड (Shopping Code) असे नानाविध मार्ग इथं अवलंबले जातात. पण, प्रत्येत वेळी या सर्वच शकला काम करतील असं नाही. पण, आता मात्र यावरही तोडगा निघणार आहे. कारण, गुगलकडून त्यासाठीचे प्रयत्नही सुरु करण्यात आले आहेत. सध्या गुगलकडून Google Flights या फिचरची चाचणी करत आहे. ज्याच्या मदतीनं युजर्स त्याच्या प्राधान्य आणि आवडीनुसार विमान तिकीट (Flight Tickets) बुक करू शकणार आहेत.
हेसुद्धा वाचा : Mumbai News : मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवास होणार आणखी सुखकर
तुम्ही तिकीट बुक केल्यानंतर एखाद्या दिवशी जर तिकीटाचे दर कमी झाले तर गुगल तुम्हाला ती रक्कमही परत करणार आहे. त्यामुळं इथं फायदा तुमचाच. सध्या हे फिचर गुगलच्या पायलट प्रोग्रामचा भाग असून, अमेरिकेत त्याची चाचणी सुरु आहे. निवडक फ्लाईट्ससाठी लागू असणाऱ्या या फिचरचा नेमका वापर कधी सुरु होणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
कारण, इथं तुम्ही तिकीट बुक केल्या दिवसापासून उड्डाणाच्या दिवसापर्यंत कंपनीकडून तिकीट दरांचा आढावा घेतला जाणार आहे. कोणत्याही दिवशी दर घसरल्यास तुम्हाला मिळालेला दर आणि नवे दर यामध्ये असणाऱ्या फरकाची रक्कम तुमच्या खात्यावरच जमा केली जाईल.