सॅन फ्रान्सिस्को - आपली ई-मेल सेवा वापरणाऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न जी-मेलकडून कायमच केला जातो. त्याचाच पुढचा भाग म्हणून एक नवे फिचर जी-मेलकडून सुरू करण्यात आले आहे. गुगलने आपल्या अधिकृत ब्लॉगपोस्टमध्ये या नव्या फिचरबद्दल माहिती दिली आहे. आता जी-मेलमध्ये ग्राहकांना राईट क्लीकची सुविधा मिळण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजे तुम्ही मेलच्या इनबॉक्समध्ये जाऊन एखाद्या मेलवर क्लीक न करता केवळ माऊसवर राईट क्लीक केल्यास त्या मेलवर पुढील कार्यवाही करणे शक्य होणार आहे. राईट क्लीकच्या साह्याने संबंधित मेल सिलेक्ट होईल आणि नंतर त्याला लेबल जोडता येईल किंवा एखाद्या फोल्डरमध्ये तो टाकता येईल किंवा तो मेल म्युट करता येईल अशा विविध सुविधा राईट क्लीकच्या साह्याने मिळणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी कोणत्याही मेलला एखादे लेबल लावण्यासाठी तो मेल आधी सिलेक्ट करावा लागत होता. पण आता राईट क्लीकच्या साह्याने ही सुविधा उपलब्ध होईल. आतापर्यंत जी-मेलच्या इनबॉक्समध्ये आलेल्या मेलवर क्लीक केल्यास केवळ तीनच पर्याय उपलब्ध होत होते. ज्यामध्ये अर्काईव्ह, मार्क ऍज अनरिड आणि डिलिट यांचा समावेश होता. पण आता नव्या फिचरमुळे राईट क्लीक केल्यावर तीन सुविधा मिळणार आहेत. ज्यामध्ये एकाच व्यक्तीकडून आलेल्या ईमेल शोधण्याचा किंवा एकाच विषयावरील ईमेल शोधण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. 


सर्व ग्राहकांना हे नवे फिचर उपलब्ध होणार असून, जी सूट वापरणाऱ्यांना ते सध्या लागू झाले आहेत. तर इतर ग्राहकांसाठी ते २२ फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहेत, असे गुगलच्या ब्लॉगपोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे.