3 दिवसात 250000 फोन बुक! `या` Made In India फोनवर ग्राहकांच्या उड्या; जाणून घ्या किंमत
Huge Response To Made In India Phone: या फोनची प्री बुकींग सुरु झाल्यानंतर अवघ्या 3 दिवसांमध्ये एवढा मोठा प्रतिसाद मिळाला की कंपनीलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या फोनचे एकूण 3 व्हेरिएंट कंपनीने बाजारात लॉन्च केले आहेत.
Huge Response To Made In India Phone: दक्षिण कोरियामधील जगप्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने मागील आठवड्यामध्ये गॅलेक्सी सीरीजअंतर्गत एक नवीन फोन सिरीज लॉन्च केली आहे. या फोन सीरीजचं नाव गॅलेक्सी एस 24 असं आहे. कंपनीने यासाठी 18 जानेवारीपासून प्री-बुकिंग सुरु केली. या सीरीजला 3 दिवसांमध्ये तुफान प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या 72 तासांमध्ये 2.5 लाखांहून अधिक ग्राहकांनी हा फोन बुक केला आहे. मागील वर्षी कंपनीने लॉन्च केलेल्या एस 23 सीरिजचे 2.5 लाख फोन बुक होण्यासाठी तब्बल 3 आठवड्यांचा कालावधी लागला होता. यंदा मात्र हा आकडा अवघ्या 3 दिवसांमध्ये गाठला आहे.
कंपनी म्हणते, यावरुन असं दिसतं की...
सॅमसंग एमएस बिझनेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू पुल्लन यांनी, "गॅलेक्सी 24 सीरीजच्या माध्यमातून चाहत्यांना AI चा उत्तमरित्या वापर करता येणार आहे. या सीरीजला मिळत असलेल्या प्रतिसादावरुन ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की देशातील ग्राहकांना नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची इच्छा आहे. ते सहज नवीन तंत्रज्ञान स्वीकारतात. आम्ही गॅलेक्सी एस 24 सीरीजला मिळत असलेल्या प्रतिसादासाठी ग्राहकांचे आबार मानतो," असं सांगितलं. गॅलेक्सी एस 24 सीरीजअंतर्गत 3 फोन बाजारात उतरवण्यात आले आहेत. गॅलेक्सी एस 24, गॅलेक्सी एस 24 प्लस, गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा अशी या फोनची नावं आहेत.
मेड इन इंडिया फोन
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार नवीन सीरीजमधील स्मार्टफोनची निर्मिती उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील कारखान्यामध्ये केली जाणार आहे. हे स्मार्टफोन परदेशात निर्यात केले जाणार आहेत. जगभरामध्ये लोकप्रिय असलेल्या आयफोनची निर्मितीही भारतातच होते. सॅमसंगचे भारतामधील कारखान्याचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले जे. बी. पार्क यांनी अमेरिकेतील आयोजित करण्यात आलेल्या गॅलेक्सी अनपॅक्ड या कार्यक्रमामध्ये गॅलेक्सी एस 24 ची निर्मिती भारतात केली जाईल असं जाहीर केलेलं. नोएडामधील कारखान्यामध्ये भारतातील पुरवठा करण्यासाठी फोन्सची निर्मिती केली जाईल. मागील वर्षी लॉन्च झालेल्या गॅलेक्सी एस 23 सीरीजची निर्मितीही याच कारखान्यात केली जायची. सॅमसंगला टक्कर देण्यासाठी गुगल लवकरच त्यांचा फ्लॅगशीप फोन पिक्सल 8 ची निर्मिती लवकरच भारतात केली जाणार आहे.
किंमत किती?
सॅमसंगच्या गॅलेक्सी एस 24 सीरीजची भारतामधील सुरुवातीची किंमत 79,999 रुपये इतकी आहे. या सीरीजमधील सर्वात महागडा फोन सॅमसंग गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा हा आहे. या फोनचं 12 जीबी रॅम + 256 जीबी व्हेरिएंट 1,29,999 रुपयांना आहे. या फोनचं 12 जीबी + 512 जीबी आणि 12 जीबी + 1 टीबी व्हेरिएंटही उपलब्ध आहे. त्याची अनुक्रमे किंमत 1,39,999 रुपये आणि 1,59,999 रुपये इतकी आहे. या सीरीज मधील गॅलेक्सी एस 24 च्या 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 79,999 रुपये आणि 89,999 रुपये इतकी आहे. या शिवाय गॅलेक्सी एस 24 प्लसच्या 12 जीबी रॅम + 256 जीबी व्हेरिएंट 99,999 रुपये आणि 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत 1,09,999 इतकी आहे.