मुंबई : डाटा चोरी प्रकरणात फेसबुकच्या अडचणी अजून संपल्याही नाहीत तोच फोटो-शेअरिंग एप 'इन्स्टाग्राम'च्याही (Instragram)अडचणींत वाढ होताना दिसतेय. लाखो सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्तींचा खासगी डाटा इन्स्टाग्रामद्वारे लीक झालाय. मुंबईची सोशल मीडिया मार्केटिंग कंपनी 'चॅटरबॉक्स'नं हा डाटाबेस ट्रेस केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वात अगोदर 'टेक क्रंच'कडून देण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये चोरी झालेल्या डाटाची माहिती देण्यात आली होती. यामध्ये अनेक प्रभावशाली व्यक्तीचे ४ करोड ९० लाख रेकॉर्डचा समावेश होता. यात फूड ब्लॉगर्स, प्रसिद्ध व्यक्ती आणि इतर सोशल मीडिया प्रभावशाली व्यक्तींचाही समावेश आहे. या रिपोर्टनुसार, प्रत्येक रेकॉर्डमध्ये माहिती, प्रोफाईल फोटो, फॉलोअर्सची संख्या, स्थळ, आणि संपर्क क्रमांक अशा पब्लिक डाटा अशा माहितीचा समावेश आहे. 


इन्स्टाग्रामच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. एखाद्या थर्ड पार्टीनं खासगी नियमांचं उल्लंघन करत इन्स्टाग्राम डाटा सेव्ह केलाय का? याचाही इन्स्टाग्राम शोध घेत आहे. चॅटरबॉक्सच्या डाटाबेसमध्ये संपर्क क्रमांक आणि ईमेल इन्स्टाग्राममधून आले किंवा नाही? हेदेखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असंही त्यांनी म्हटलंय. 


नेमकं काय घडलंय? डाटा चोरी प्रकरणात थर्ड पार्टीचा हात आहे का? हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, असंही कंपनीकडून सांगण्यात येतंय. 



चॅटरबॉक्स ही एक वेब डेव्हलमेंट कंपनी आहे जी कंटेटला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडियातील प्रभावी व्यक्तींना मोबदला देते.