जिओ फोनची बूकिंग सुरू होताच वेबसाईट क्रॅश
रिलायन्सचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत 4G VoLTE फीचर फोनच्या बूकिंगला सुरुवात झाली आहे.
मुंबई : रिलायन्सचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत 4G VoLTE फीचर फोनच्या बूकिंगला सुरुवात झाली आहे. पण बूकिंग सुरू होताच www.jio.com ही वेबसाईट क्रॅश झाली आहे. वेबसाईटवर जास्त लोड आल्यामुळे ही वेबसाईट अत्यंत हळू चालत आहे, त्यामुळे फोन बूक करणं कठीण झालं आहे.
जिओच्या या फोनच्या बूकिंगला गुरुवारी साडेपाच वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. पण अनेकांना www.jio.com ही वेबसाईट सुरु करता आली नाही तर मायजिओ अॅप उघडण्यातही अपयश आलं आहे.
रिलायन्स कंपनीचं या फोनच्या माध्यमातून जवळपास ५० कोटी फीचर फोन युजर्सपर्यंत पोहचण्याचं लक्ष आहे. तसेच आठवड्याभरात ५० लाख जिओफोन्सची डिलिव्हरी करण्याचं कंपनीचं लक्ष आहे.
५०० रुपये देऊन कंपनीच्या वेबसाइटवर तसेच 'मायजिओ' अॅपवर फोनची प्री-बुकींग ग्राहकांना करता येईल. कंपनीने हा फोन फ्री देण्याचं म्हटलं असलं तरी १५०० रुपये ग्राहकांना डिपॉझिट म्हणून द्यावे लागणार आहेत. प्री-बुकींग करताना ५०० रुपये तर शिल्लक १००० रुपये फोनची डिलिव्हरी झाल्यावर द्यावे लागणार आहेत. ग्राहकाने तीन वर्ष म्हणजेच ३६ महिन्यांनंतर जिओफोन परत केल्यास त्याला १५०० रुपये परत मिळतील.
कंपनीच्या मते, भारतीयांद्वारे, भारतात तयार करण्यात आलेला आणि भारतीयांसाठी हा फोन बनवला आहे. जिओचे ग्राहक जिओफोनच्या माध्यमातून १५३ रुपये मासिक अनलिमिटेड डेटाचा वापर करु शकतील. यासोबतच कंपनीने ५३ रुपये साप्ताहिक प्लॅन आणि २३ रुपयांत दोन दिवसांसाठीचा प्लॅनही सादर केला आहे. कंपनीच्या ग्राहकांसाठी कॉलिंग नेहमीच फ्री असणार आहे.