मारूती सुझुकीची शानदार सियाज एस कार लॉन्च, जाणून घ्या किंमत
मारुती सुझुकी या देशातील लोकप्रिय कंपनीनं आपल्या सियाज कारचं नवं व्हेरिएंट सियाज एस लाँच केलं आहे. ही शानदार स्पोर्टी मॉडल असलेली कार पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे.
मुंबई : मारुती सुझुकी या देशातील लोकप्रिय कंपनीनं आपल्या सियाज कारचं नवं व्हेरिएंट सियाज एस लाँच केलं आहे. ही शानदार स्पोर्टी मॉडल असलेली कार पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे.
पेट्रोल कारची किंमत ९.३९ लाख आहे तर डिझेल कारची किंमत ११.५५ लाख (एक्स शोरुम किंमत) आहे.सियाजच्या या कारमध्ये नवे फीचरही देण्यात आले आहेत. या कारमधील केबिनला ऑल ब्लॅक कलर देण्यात आला आहे. सीट ब्लॅक कलर लेदरने तयार करण्यात आल्या आहेत.
सियाज एसमध्ये रेग्युलर मॉडेल इंजिन देण्यात आलं आहे. पेट्रोल कारमध्ये १.४ लीटर इंजिन आहे. जे ९२ पीएस पॉवर आणि १३० एनएम टॉर्क आहे. तर डिझेल कारमध्ये १.३ लीटर इंजिन असून ९० पीएस पॉवर आणि २०० एनएम टॉर्क आहे. दोन्ही व्हेरिएंटमध्ये ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
आधीच्या मॉडलपेक्षा किती आहे वेगळी ?
आधीच्या सियाजच्या तुलनेत नवीन सियाज एस ही जास्त स्पोर्टी आहे. स्पोर्ट मॉडलची आवड असणा-या ग्राहकांना ही पसंत पडेल. मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक आर.एस.कलसी म्हणाले की, ‘सियाज आम्ही ऑक्टोबर २०१७ मध्ये लॉन्च केली होती. तेव्हापासून या कारचे १.७० लाख यूनिट्स विकले गेले आहेत. आता ग्राहकांच्या गरजांनुसार कंपनीने सियाजचं स्पोर्टी मॉडल सादर केलं आहे’.
या कार्ससोबत होणार स्पर्धा -
मारूती सियाज या कारची स्पर्धा ह्युंदाई वेरना, होंडा सिटी, स्कोडा रॅपिड या कारशी असणार आहे. येत्या २२ ऑगस्टला ह्युंदाई आपली नवीन वरना कार लॉन्च करणार आहे. अशात आता सेडान सेगमेंटच्या कारची स्पर्धा अधिकच वाढणार आहे.