जिओच वरचढ; इंटरनेट डेटा यूजमध्ये भारत क्रमांक १वर
आपल्या खिशाचा अंदाज घेत भारतीय अगदी तोलून-मापून इंटरनेट डेटा वापरत असत. दरम्यान, भारतीय टेलीकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओची एण्ट्री झाली आणि चित्रच पालटले. जिओने पदार्पणातच टोटल फ्री हे गणित जमवून दिल्यामुळे भारतात डेटा यूजचा जणू महापूरच आला. याचा परिणाम म्हणून मोबाईल डेटा वापरण्यात भारत १५५ व्या स्थानावरून थेट यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे.
नवी दिल्ली : आपल्या खिशाचा अंदाज घेत भारतीय अगदी तोलून-मापून इंटरनेट डेटा वापरत असत. दरम्यान, भारतीय टेलीकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओची एण्ट्री झाली आणि चित्रच पालटले. जिओने पदार्पणातच टोटल फ्री हे गणित जमवून दिल्यामुळे भारतात डेटा यूजचा जणू महापूरच आला. याचा परिणाम म्हणून मोबाईल डेटा वापरण्यात भारत १५५ व्या स्थानावरून थेट यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे.
भारतीयांना इंटरनेटची त्यातही मोबाईल इंटरनेटची सवय लावण्यात रिलायन्स जिओ आघाडीवर आहे. नाही म्हणायला एअरटेल, व्होडाफोन, आयडिया, बीएसएनएल यांसारख्या कंपन्या पूर्वी इंटरनेट सेवा द्यायच्या. मात्र, ही सेवा घेण्यासाठी ग्राहकांना बराच पैसा खर्च करावा लागत होता. दरम्यान, रिलायन्स जिओने या क्षेत्रात आगमन केले आणि भारतीयांच्या इंटरनेट डेटा वापरास काही धारबंदच राहिला नाही. महिन्याकाठी काही MBत डेटा खर्च करणारे भारतीय आता प्रतिमहिना काही कोटी जीबी वापरू लागले आहेत. आकडेवारीत सांगायचे तर, पूर्वी २० कोटी GBच्या आसपास असलेले हे प्रमाण आता चक्क १५० कोटी GBवर पोहोचले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवर नजर टाकता भारत १५५व्या रॅंकवरून थेट पहिल्या स्थानावर आला आहे.
आजवर इंटरनेट डेटा वापरामध्ये आघाडीवर असलेल्या अमेरिका, चीनलाही भारताने मागे टाकले आहे. जिओ दावा करत आहे की, इंटरनेट डेटा वापरणाऱ्या एकूण भारतीयांपैकी १२५ कोटी GB डेटा वापरणारे फक्त रिलायन्सचेच ग्राहक आहेत.
रिलायन्स जिओने केलेल्या दाव्यानुसार, रिलायन्स जिओवरून प्रतिमहिना होणारी व्हिडिओ स्ट्रीमिंग १६५ इतकी आहे. तर, एका आठवड्यात टीव्ही पाहणारांच्या तुलनेत मोबाईल वापरणाऱ्यांचे (ऑनलाईन) प्रमाण सातपटीने अधिक आहे. जिओने दिलेल्या माहितीचा हवाला देऊन 'नवभारत टाईम्स'ने दिलेल्या वृत्तात, म्हटले आहे, 4G येण्यापूर्वी शंका व्यक्त केली जात होती की, महागडी डेटा सर्विस असल्यामुळे इंटरनेट यूजर्सच्या संख्येत घट होईल. पण, प्रत्यक्षात उलटेच चित्र दिसत असून, रिलायन्सकडे १० कोटींहून अधिक ग्राहक असे आहेत जे, जिओ प्राईमसाठी खर्च करतात. भारतात सद्यस्थितीला ७५ टक्के लोक रिलायन्स नेटवर्क वापरतात. येत्या काळात हे नेटवर्क ९९ टक्क्यांवर पोहोचेल, असा विश्वासही जिओने व्यक्त केला आहे.
दरम्यान, २०१५ च्या पहिल्या तिमाहीत स्मार्टफोन क्षेत्रात ७२ टक्के हिस्सा हा 3G फोनचा होता. तर, २३ टक्के हिस्सा हा 2G फोनचा होता. मात्र, २०१७ च्या पहिल्याच तिमाहीत ९५ टक्के हिस्सा 4G आणि उर्वरीत ५ टक्क्यांत 3G आणि 2Gची हिस्सेदारी राहिली आहे.