धक्कादायक! Bluetooth Earphone कानात फुटला आणि तरुणाचा गेला जीव
तुम्ही जर Bluetooth Earphone वापरत असाल किंवा तो घेण्याचा विचार करत असाल तर थांबा! ही बातमी आधी वाचा
जयपूर: चार्जिंगला फोन लावला किंवा फोनच्या बॅटरीमध्ये स्फोट झाल्यानं दुर्घटना घडल्याच्या अनेक बातम्या वाचल्या असतील. आता चक्क फोन नाही तर इयरफोनमध्ये स्फोट झाला आहे. तुम्ही जर Bluetooth Earphone वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही सतत Bluetooth Earphone कानाला लावत असाल तर ते तुमच्यासाठी धोक्याचं आणि जीवावर बेतणारं ठरू शकतं.
मिळालेल्या माहितीनुसार, चौमूच्या उदयपुरिया गावात, एक तरुण कानात ब्लूटूथ इयरफोन लावून बोलत होता. त्याचवेळी, कानातील इयरफोनचा स्फोट झाला. मोठा आवाज आल्याने खळबळ उडाली. या घटनेत युवकाच्या दोन्ही कानांना जखम झाली आहे. राजस्थानची राजधानी जयपूरच्या चौमू भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
जखमी युवकाला तातडीने शहरातील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. राकेश नगर असे मृताचे नाव आहे. डॉक्टरांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. हॉस्पिटलचे डॉक्टर एल. एन रुंडला म्हणाले की, देशात इयरफोन स्फोटाची ही बहुधा पहिलीच घटना आहे. मात्र, युवकाचा मृत्यू बहुधा कार्डियाक अरेस्टमुळे झाला असावा.
मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट होण्याच्या घटना या पूर्वीही घडल्या आहेत. मात्र इयरफोनमध्ये स्फोट झाल्याची ही पहिलीच घटना असावी असा अंदाज आहे. त्यामुळे ही घटना मोठी असून नागरिकांना इयरफोन वापरताना सावध राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.