मुंबई - स्वस्तात मस्त सेकंड हॅंड वस्तू घेण्याकडे अनेकांचा कल असतो. आतापर्यंत साधारणपणे वैयक्तिक संपर्कातून किंवा काही ऑनलाईन साईटच्या माध्यमातूनच सेकंड हॅंड वस्तूंची खरेदी-विक्री केली जात होती. पण या क्षेत्रातील भारतातील एक मोठी कंपनी आता या स्वरुपाच्या वस्तूंच्या विक्रीसाठी भारतात २०० दुकाने सुरू करणार आहे. राँकिंग डिल्स या कंपनीने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही दुकाने महानगरांऐवजी टिअर २ श्रेणीतील शहरांत सुरू करण्यात येतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेकंड हॅंड वस्तूंची किंमत नव्या वस्तूपेक्षा ७० टक्क्यांच्या आसपास कमी असते. त्यामुळे आर्थिक विचार करून अनेक ग्राहक सेकंड हॅंड वस्तू वापरण्यालाच प्राधान्य देतात. आतापर्यंत ठराविक वस्तूच सेकंड हॅंड म्हणून खरेदी केल्या जात होत्यात किंवा विकल्या जात होत्या. पण रॉकिंग डिल्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी युवराज अमन सिंह म्हणाले की, त्यांची कंपनी एकूण १८ श्रेणीतील सेकंड हॅंड वस्तूंची खरेदी विक्री करते. सुरुवातीला मोबाईल हॅण्डसेट आणि त्याच्या अॅक्सेसरिजच सेकंड हॅंड स्वरुपात विकण्याला प्राधान्य दिले जायचे. पण आता स्थिती बदलली आहे. आमची कंपनी टीव्ही, फ्रिज, रोजच्या कामांसाठी लागणाऱ्या विविध वस्तू आणि घरगुती वस्तूंची सेकंड हॅंड स्वरुपात विक्री करणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही स्वरुपात या वस्तूंची विक्री केली जाईल.


कंपनीने पुढील पाच वर्षांत एकूण ५०० कोटींचा महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. कोणतीही सेकंड हॅंड वस्तू विकण्यापूर्वी त्याची विविध निकषांवर चाचणी केली जाते आणि चाचणी यशस्वी ठरली तरच ती वस्तू विकली जाते. ही कंपनी सध्या अॅमेझॉन, स्नॅपडील, क्विकर, जंगली या ऑनलाईन व्यासपीठांच्या माध्यमातून वस्तूंची विक्री करत आहे. 


कंपनीने महानगरांऐवजी टिअर २ श्रेणीतील शहरांत आपली दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शहरात दुकाने सुरू केली तर त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.