चतुर्थीच्या मुहूर्तावर `Jio Air Fiber`चा श्रीगणेशा; विनाकेबल मिळेल हाय-स्पीड 5जी इंटरनेट
Jio Air Fiber launch: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 46 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज पार पडली. यावेळी मुकेश अंबानी यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
Jio AirFiber Launch: रिलायन्सने भारतातील नागरिकांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जिओ एअर फायबर (Jio Air Fiber) लाँच करण्यात येणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचे संचालक मुकेश अंबानी यांनी सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 46व्या वार्षिक बैठकीत (AGM) याबाबत घोषणा केली आहे. जिओ एअर फायबर हे 5जी नेटवर्क आणि उत्तम वायरलेस टेक्नोलॉजी असून कार्यालयांबरोबरच घरातही वायरलेस ब्रॉडबँड सर्विस मिळणार आहे.
जिओ फायबर लाँच होताच दूरसंचार क्षेत्रात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे की, 1 कोटीहून अधिक परिसर आमच्या ऑप्टिकल फायबर सर्व्हिस जिओ एअर फायबरला जोडल्या गेल्या आहेत. आत्ताही लाखो परिसर असे आहेत जिथे कनेक्टिव्हिटी पोहोचवण्याची आव्हान आहे. मात्र, जिओ एअर फायबर लवकरच यावरही मात करेल. या माध्यमातून आम्ही 20 कोटी घरे आणि परिसरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. जिओ एअर फायबर आल्यानंतर प्रत्येकदिवशी जिओ 1.5 लाख नवीन ग्राहक जोडले जाणार आहेत.
ऑप्टिकल फायबर इन्फ्रास्ट्रक्चर संपूर्ण भारतात जवळपास 15 लाख किमीपर्यंत पसरले आहे. ऑप्टिकल फायबरवर प्रत्येक ग्राहक दरमहिन्याला 280 जीबीहून अधिक डेटाचा उपयोग करु शकतो. हा डेटा जिओच्या प्रति व्यक्ती मोबाइल डेटापेक्षा 10 टक्क्यांहून अधिक आहेत. दरम्यान, मुकेश अंबानी यांनी जिओ एअर फायबरसोबतच जिओ ट्रू 5जी डेव्हलपर प्लॅटफॉर्म आणि जिओ ट्रू 5 जी लॅबदेखील लाँच करण्यात आले आहे.
मुकेश अंबानी यांनी जिओ एअर फायबर लाँचची घोषणा करताना आणखी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आम्ही एक व्यासपीठ तयार करत आहोत जे भारतीय उद्योग, व्यवसाय आणि स्टार्ट-अप्सचा डिजिटल जगाशी संवाद साधण्याचा मार्ग बदलेल. एंटरप्राइझच्या गरजा लक्षात घेऊन, Jio ने 5G नेटवर्क, एज कंप्युटिंग आणि अॅप्लिकेशन्स एकत्र करून एक सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. दुसरीकडे, 'Jio True 5G लॅब' मधील आमचे तंत्रज्ञान भागीदार उद्योग-विशिष्ट समाधाने विकसित, चाचणी आणि सह-निर्मित करू शकतात. जिओ ट्रू 5जी लॅब रिलायन्स कॉर्पोरेट पार्क, नवी मुंबई येथे असेल.
एका अहवालानुसार, जिओ एअर फायबरचे डिव्हाइसचा स्पीड 1 Gbpsपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच या स्पीडनुसार अगदी एक मिनिटांत तुम्ही चित्रपट डाऊनलोड करु शकता. तसंच, हे डिव्हाइस स्मार्टफोनप्रमाणेच एका जागेवरुन दुसऱ्या जागेवरही नेऊ शकता. तसंच, जिओ एअर फायबर चालवण्यासाठी डिव्हाइसमध्ये जिओचे 5जी सिमकार्ड टाकावे लागणार आहे. कंपनीने अनेक व्हेरिएंटसह रिचार्ज प्लानदेखील लाँच केले आहेत.