काँग्रेसच्या `या` नेत्यावर ५,००० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार रिलायन्स
अनिल अंबानी यांच्याकडे असलेल्या रिलायन्स ग्रुपने काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची तयारी केली आहे.
नवी दिल्ली : अनिल अंबानी यांच्याकडे असलेल्या रिलायन्स ग्रुपने काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची तयारी केली आहे.
खोटी आणि बदनामी करणारी विधानं
रिलायन्स उद्योग समुहाविरोधात खोटी आणि बदनामी करणारी विधानं केल्याने काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांच्याविरोधात दावा ठोकण्याची तयारी रिलायन्सने केली आहे.
१.८८ लाख कोटींची कर्जमाफी
रिलायन्स ग्रुपच्या प्रवक्ताने दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक मनु सिंघवी यांनी वित्त मंत्री अरुण जेटली लोकांना मूर्ख बनवत असल्याचा आरोप केला आहे. तसेच सरकारने मोठ्या उद्योगसमूहांवरील कोट्यावधी रुपयांचं कर्ज माफ करण्याची तयारी सुरू केली असल्याचं सिंघवी यांनी म्हटलं होतं. तसेच ही कर्जमाफी १.८८ लाख कोटींची आहे.
५० कंपन्यांवर ८.३५ लाख कोटींचं कर्ज
देशातील ५० कंपन्यांवर ८.३५ लाख कोटींचं कर्ज आहे. या कंपन्यांमध्ये रिलायन्स समूह, अदानी आणि एस्सार समूहाचा समावेश अल्याचं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं होतं.
या तीन कंपन्यांपैकी एका दूरसंचार क्षेत्रातील कंपनीने आपला व्यवसाय बंद करणार असल्याचं जाहीर केलं आहे, या कंपनीवर ४५ हजार कोटींचं कर्ज आहे असेही सिंघवी यांनी म्हटलं होतं.
या आरोपांमुळे काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांच्याविरोधात ५ हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची तयारी रिलायन्स उद्योगसमूहाने सुरू केलीय.