मुंबई : आर्थिक वर्ष २०१७-१८ या दुसऱ्या तिमाहीमध्ये (जुलै ते सप्टेंबर) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) चा नफा १२.५ टक्के वाढून ८,१०९ कोटी रुपये एवढा झाला आहे. या काळामध्ये कंपनीच्या महसुलामध्ये २३.९ टक्के वाढ होऊन तो १,०१,१६९ कोटी रुपये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरआयएलला एकीकडे एवढा नफा होत असताना इंटरनेट विश्वामध्ये खळबळ माजवणाऱ्या रिलायन्स जिओला जुलै ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये २७०.५९ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. याआधीच्या तिमाहीमध्ये जिओचं नुकसान २१.३ कोटी रुपये एवढं होतं. या आकडेवारीची घोषणा रिलायन्सकडून शेअर बाजार बंद झाल्यावर केली. रिलायन्सचा शेअर शुक्रवारी ०.४८ टक्के वाढून ८७६.७ रुपयांवर बंद झाला.


जिओच्या ग्राहकांची संख्या ३० सप्टेंबरपर्यंत १३.८६ कोटी होती. मागच्या तिमाहीमध्ये जिओच्या ग्राहकांमध्ये १.५३ कोटींची वाढ झाली. तर मागच्या तिमाहीत एकूण वायरलेस डेटा ट्रॅफिक ३७८ कोटी जीबी होता. या काळामध्ये वॉईस ट्रॅफिक २६७ कोटी मिनीट प्रती दिवस होता.