नवी दिल्ली : व्होडाफोन-आयडिया आणि एयरटेलनंतर आता रिलायन्स जिओनेही ग्राहकांना धक्का दिला आहे. रिलायन्स जिओनेही त्यांचं टॅरिफ शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या काही आठवड्यांमध्ये हे दर वाढतील, असं जिओकडून सांगण्यात आलं आहे. यामुळे आता सामान्यांच्या खिशातून जास्त पैसे जाणार आहेत. दर वाढवले तरी डेटा वापरावर याचा प्रतिकूल परिणाम होणार नाही, असा विश्वास जिओने वर्तवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्होडाफोन-आयडिया आणि एयरटेलने कालच १ डिसेंबरपासून शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं होतं, यानंतर आता जिओनेही हीच घोषणा केली आहे. मोबाईल सेवेच्या दरांमध्ये संशोधन करण्यासाठी ट्राय कंपन्यांसोबत सल्लामसलत करणार आहे. पण सध्यातरी ट्राय कंपन्यांकडून होणाऱ्या दरवाढीची वाट बघणार आहे, असं ट्रायच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. ही दरवाढ झाल्यानंतर ट्राय शुल्क वाढ नियमानुसार आहे का नाही ते पाहणार आहे.


इतर कंपन्यांप्रमाणे आम्हीही सरकारसोबत काम करु, असं जिओकडून सांगण्यात आलं आहे. जिओने याआधी दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी आययूसी व्हाऊचर आणले होते, यानंतर आता टॅरिफ शुल्कही वाढवण्यात येणार आहे.