मुंबई : 4G सेवेमध्ये धमाका केल्यानंतर आता रिलायन्स जिओ 5G सेवा आणण्याची तयारी करत आहे. जिओनं याची रणनिती आखायलाही सुरुवात केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं अमेरिकेची दुरसंचार कंपनी रॅडिसिससोबत करार केला आहे. रिलायन्स लवकरच रॅडिसिसमधले सगळे शेअर खरेदी करेल. रिलायन्सकडून याबाबत शेअर बाजारामध्ये माहिती देण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं दिलेल्या माहितीनुसार रॅडिसिस ओपन टेलीकॉम प्लॅटफॉर्म सोल्यूशन्सचं नेतृत्व करतं. भविष्यात 5G सुविधा देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.


अशी होणार खरेदी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास ७.४ कोटी डॉलर देऊन रिलायन्स रॅडिसिस कंपनीचे १०० टक्के शेअर खरेदी करणार आहे. शेअर बाजारात दिलेल्या माहितीनुसार रिलायन्सनं १.७२ डॉलर प्रति शेअर एवढी किंमत रिलायन्स मोजणार आहे. या खरेदीमुळे जिओला 5G सेवा देण्यासाठी मदत होईल, असं वक्तव्य आकाश अंबानींनी केलं आहे. २०१८ सालच्या चौथ्या तिमाहीमध्ये हा करार पूर्ण होईल असं बोललं जातंय.


आकाश अंबानींच्या साखरपुड्यालाच झाला करार


आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या साखरपुड्याच्याच दिवशी या कराराची घोषणा करण्यात आली. देशभरामध्ये रिलायन्स जिओचे २० कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत.


२०१८ मध्येच सुरु होणार 5G सेवा


२०१८ मध्येच जिओची 5G सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. बार्सिलोनामध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्येच रिलायन्स जिओनं याची घोषणा केली होती. जिओनं यासाठी मोबाईल कंपनी सॅमसंगसोबत करारही केला आहे. आता रॅडिसिससोबत झालेल्या करारानंतर 5G सेवा देण्यासाठी जिओनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.