टोयोटाकडून छोट्या डिझेल कारची विक्री बंद
भारतात टोयोटा आणि किर्लोस्कर ग्रुप यांचा संयुक्त व्यवसाय आहे.
मुंबई : जापानची ऑटोमोबाइल कंपनी टोयोटा भारतात बीएस ६ इमिशन नॉर्म्स लागू झाल्यानंतर छोट्या डिझेल कारची विक्री बंद करण्याच्या तयारीत आहे. भारतात टोयोटा आणि किर्लोस्कर ग्रुप यांचा संयुक्त व्यवसाय आहे. कंपनी इनोव्हा, फॉर्च्यूनर यांसारख्या मोठ्या आणि उपयोगी गाड्या ज्यामध्ये डीजेल ऑप्शन कायम ठेवणार आहे. छोट्या डीजेलच्या गाड्या बंद करण्यात आल्या तरी मोठ्या गाड्यामध्ये डीजेलचे पर्याय असणार आहे.
टोयोटा कंपनी १.३ लिटर डिझेल इंजिन बंद करणार आहे. हे डिझेल इंजिन सध्या Toyota Etios, Etios Cross, Liva आणि Corolla Altis मध्ये देण्यात आलं आहे. म्हणजे कंपनीकडून ४ छोट्या इंजिनच्या गाड्या बंद करण्यात येणार आहेत.
टोयोटा गाड्यामधील Etios सीरिज आता तिच्या अंतिम टप्प्यावर आहे. कंपनी Corolla Altis चे डिझेल व्हेरिएंट्स बंद करणार आहे. कारण, बीएस इमिशन नॉर्म्स लागू झाल्यानंतर या कारची वाढणारी किंमत ग्राहकांसाठी योग्य नसेल. अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.
'जगभरात टोयोटा आपली Altis मध्ये हाइब्रिड टेक्नॉलजीचा वापर करत आहे. भारतीय बाजारात एक्झिक्युटीव्ह सेडान सेगमेंटची विक्री घटून ५०० ते ६०० युनिट्स प्रति महिन्यावर आली आहे.' आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने वक्तव्य केले आहे.
'आम्हाला अद्यापही डिझेल व्हेरिएंट्सलाच जास्त पसंती असल्याचे दिसत आहे आणि भविष्यात अधिक नवीन तंत्रज्ञान येईपर्यंत या गाडयांची निर्मिती सुरू राहिल.' असे माहिती उप व्यवस्थापकीय संचालक एन. राजा यांनी दिली.
टोयोटा किर्लोस्कर मोटरने जानेवारी ते सप्टेंबर २०१९ पर्यंत ९९ हजार ९७९ गाड्यांची विक्री केली आहे. परंतु कंपनीकडून विक्री करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये इनोव्हा, फॉर्च्यूनरचे प्रमाण जास्त आहे.