Samsung च्या नव्या स्मार्टवॉचमुळे Apple ची धास्ती वाढली, कारण...
स्मार्टफोननंतर गॅझेट्सप्रेमींमध्ये उत्सुकता असते ती स्मार्टवॉचची. नव्या फीचर्सबाबत कायमच कुतूहुल असतं. आता सॅमसंग आपले नवीन स्मार्टवॉच Samsung Galaxy Watch 5 लाँच करणार आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक गॅझेट्सबद्दल उत्सुकता असते. प्रत्येक गॅझेट्समध्ये नव्या फीचर्ससह अपडेट येत आहेत. स्मार्टफोननंतर गॅझेट्सप्रेमींमध्ये उत्सुकता असते ती स्मार्टवॉचची. नव्या फीचर्सबाबत कायमच कुतूहुल असतं. आता सॅमसंग आपले नवीन स्मार्टवॉच Samsung Galaxy Watch 5 लाँच करणार आहे. अलीकडेच या स्मार्टवॉचच्या काही फीचर्सबाबत माहिती समोर आली आहेत. त्यामुळे ॲपलची धाकधूक वाढली आहे. कारण या स्मार्टवॉचमध्ये असलेलं फीचर Apple Watch Series 8 सोबत स्पर्धा करू शकते.
सॅमसंग हेल्थ ॲपच्या बीटा अपडेटद्वारे या स्मार्टवॉचच्या काही फीचर्सची माहिती मिळाली आहे. हे स्मार्टवॉच Samsung Galaxy Watch 5 आणि Samsung Galaxy Watch 5 Pro या दोन व्हेरियंटमध्ये लाँच केले जाऊ शकते. Redditor ने शेअर केलेल्या स्क्रिनशॉटनुसार सॅमसंगच्या स्मार्टवॉचमध्ये 'स्किन टेम्परेचर ड्यूरिंग स्लीप' हा पर्याय दिला जाऊ शकतो. आगामी ॲपल वॉचसाठी या फीचर्सची चाचपणी सुरु आहे. लीकनुसार तापमान सेंसर Apple Watch Series 8 मध्ये असणार आहे. मात्र ॲपलने या फीचरची पुष्टी केलेली नाही.
सॅमसंग गॅलक्सी Watch 5 हे 40mm आणि 42mm अशा दोन आकारात लाँच केलं जाऊ शकतं आणि त्याचे प्रो वॉच त्याच आकारात उपलब्ध करून दिले जाईल. सॅमसंग गॅलक्सी Watch 5 मध्ये तुम्हाला टायटॅनियम बॉडी आणि सॅफायर ग्लास मिळू शकतो आणि त्याची बॅटरी 572mAh असू शकते. सध्या या स्मार्टवॉचबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.