मुंबई : टाटा कंपनीनं तीन महिन्यांमध्ये त्यांची तिसरी कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या काही वर्षांमध्ये ऑटो मार्केटमध्ये आलेल्या बदलांमुळे छोट्या गाड्यांची विक्री घसरली आहे. ग्राहकांना कॉम्पॅक्ट सेगमेंट आणि युटिलिटी वेहिकल्स हव्या आहेत. याच गाड्यांची मागणी जास्त असल्यामुळे टाटानं इंडिका आणि इंडिगो या दोन गाड्या बंद केल्या. यानंतर आता टाटा त्यांच्या स्वप्नातलं प्रोजेक्ट असलेली आणखी एक कार बंद करणार आहे. कमी विक्री हेच यामागचं कारण आहे.


टाटा नॅनो बंद होणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडिका आणि इंडिगो पाठोपाठ टाटाची सगळ्यात छोटी कार नॅनोही बंद होणार आहे. २०१८ साली फक्त १८५१ नॅनो कारची विक्री झाली. १९९८ साली लॉन्च झालेल्या इंडिकाची यावर्षी २,५८३ मॉडेल्स आणि २००२मध्ये लॉन्च झालेल्या इंडिगोची यावर्षी १,७५६ मॉडेल्स विकली गेली होती.


रतन टाटांचं स्वप्नातलं प्रोजेक्ट


नॅनो बाजारात आणणं हे रतन टाटांचं स्वप्न होतं. २००९ साली टाटा नॅनो लॉन्च झाली. पण काही कालावधीनंतर बाजारामध्ये नॅनोची मागणी घटली. २०१५ साली नॅनोचं GenX व्हर्जन लॉन्च करण्यात आलं. यामध्ये ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशनची सुविधा देण्यात आली. पण कारच्या विक्रीवर कोणताही परिणाम झाला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नॅनो पुढच्या वर्षी बंद होईल. टाटाच्या गुजरातच्या साणंड प्लॅण्टमध्ये नवीन मॉडेल असलेल्या टियागो बनवण्याची तयारी सुरु आहे. टियागोची विक्री सध्या चांगली आहे.


२०१२ साली नॅनोची सर्वाधिक विक्री


२०१२ साली नॅनोची सर्वाधिक ७४,५२४ गाड्यांची विक्री झाली होती. पण यानंतर नॅनोच्या विक्रीमध्ये सातत्यानं घट झाली. २०१६ साली २१,०१२, २०१७ साली ७,५९१ आणि २०१८ साली फक्त १,८५१ नॅनोंची विक्री झाली.


इलेक्ट्रिक कार यायची शक्यता


टाटा आता इलेक्ट्रिक कार बनवण्याच्या तयारीमध्ये आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा नॅनोचं इलेक्ट्रिक व्हर्जनही आणू शकते. पण याची किंमत नॅनोएवढी ठेवणं अशक्य असेल. २०२१ सालापर्यंत इलेक्ट्रिक कार आणण्याची टाटाची रणनिती आहे.