मुंबई : रस्त्याने चालताना, ट्रेनमधून-बसमधून प्रवास करताना कुठेही नजर फिरवा... तुमच्या आजुबाजुला बसलेली स्मार्टफोन वापरणारी मंडळी फोनमध्ये गुंतलेली दिसतील... चालतानाही स्मार्टफोन तीन-तीन वेळा पाहणं इतकं गरजेचं बनलंय? असा साहजिकच प्रश्न तुमच्याही मनात अनेकदा आला असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मान्य केलं की, स्मार्टफोन ही आजच्या काळात गरजेची गोष्ट बनलीय. पण, याच स्मार्टफोनमुळे तरुणांमध्ये नैराश्य वाढत चालत असल्याचं समोर येतंय. 


आत्महत्येच्या प्रमाणात वाढ


याच विषयावर अमेरिकेच्या सॅन डिएगो स्टेट युनिव्हर्सिटीत एक रिसर्च करण्यात आला. या रिसर्चमधून समोर आलेले आकडे केवळ धक्कादायक आहेत. गेल्या दशकभरात मुलं आणि तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढल्याचंही यात म्हटलंय. १५ ते १९ वर्षांच्या तरुणांत २००७ - २०१५ या काळात आत्महत्येच्या प्रकरणांत ३१ टक्के वाढ झालीय. तर मुलींमध्ये हा आकडा दुप्पट आहे.


मानसिक समस्यांत वाढ


फेसबुकनं दिलेल्या माहितीनुसार, ९० च्या दशकातील तरुण मंडळी एका दिवसात जवळपास १५० वेळा आपला स्मार्टफोन चेक करतात. संशोधनानुसार, जी मुलं स्मार्टफोन वापरतात ती मुलं अगोदरच्या मुलांपेक्षा कमी आनंदी दिसतात... तर गॅजेटससोबत वेळ घालवतात त्यांना मानसिक समस्या अधिक भेडसावतात. 


या संशोधनासाठी फेसबुक, स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या पाच लाखांहून अधिक तरुणांचा अभ्यास केला. महत्त्वाचं म्हणजे, असे तरुण आपल्या भविष्याबद्दल निराशावादी दिसले...  


भारतात २००७ साली केवळ ३४ टक्के तरुणांकडे मोबाईल होता... आज हा आकडा ८१ टक्क्यांवर पोहचलाय. त्यामुळे तरुणांनी आणि पालकांनी वेळीच सतर्क व्हायला हवं.