नवी दिल्ली : या उत्सवाच्या सीझनमध्ये जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नवरात्रीच्या निमित्ताने अनेक मोठ्या कार निर्मिती कंपन्यांनी त्यांच्या कार्सवर ऑफर दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठे काही कंपन्यांच्या कार्ससोबत मोफत हॅचबॅक कार जिंकण्याची संधी मिळत आहे. तर कुठे काही ९० हजार रूपयांपर्यंतचे डिस्काऊंट मिळत आहे. 


टाटाची कार खरेदी केल्यास टियागो मोफत 


या वेगवेगळ्या ऑफर्समध्ये टाटा मोटर्सकडून मोठी ऑफर आणली गेली आहे. टाटाची कोणतीही कार खरेदी केल्यास प्रत्येक आठवड्यात टियागो जिंकण्याची संधी मिळत आहे. यासोबतच कंपनी आकर्षक एक्सचेंज ऑफरही देत आहे. इतकेच नाही तर कंपनी टाटा सफारी स्टॉर्मवर ८० हजार रूपयांची महाबचत ऑफरही देत आहे. टाटा सफारी स्टॉर्मची किंमत १०.४२ लाख रूपयांपासून सुरू होते. तसेच, टाटा जेस्टवर ४० हजार रूपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. या कारची किंमत ५.२२ लाखांपासून सुरू होते. 


ह्युंदाईवर ९० हजार रूपयांचा फायदा


ह्युंदाईनेही आपल्या काही कार्सवर ऑफर देऊ केली आहे. ह्युंदाईकडून आकर्षक कॅश लाभ, एक्सचेंज ऑफर आणि सरकारी कर्मचा-यांसाठी स्पेश्ल डिस्काऊंट ऑफर दिली जात आहे. ह्युंदाईकडून सर्वात मोठा डिस्काऊंट ग्रॅन्ड आय१० या कारवर दिला जात आहे. ह्युंदाई ग्रॅन्ड आय१०च्या डिझल व्हेरिएंटवर ९० हजार रूपयांचा फायदा मिळत आहे. यासोबतच पेट्रोल इंजिन असलेल्या ग्रॅन्ड आय१० कारवर ८० हजार रूपयांचा फायदा होणार आहे. तसेच, कंपनीच्या इऑन या छोट्या कारवर ५५ हजार रूपयांची सूट दिली जात आहे. तसेच, नव्या एक्सेंट सेडानच्या पेट्रोल आणि डिझल इंजिन व्हेरिएंटवर ५० हजार रूपयांची सूट दिली जात असल्याची माहिती आहे. 


महिंद्रा केयूवेही१०० कारवर ८० हजार रूपयांचा डिस्काऊंट


महिंद्राकडूनही अनेक ऑफर दिल्या आहेत. महिंद्राने त्यांच्या मायक्रो एसयूवी केयूवी१०० कारवर ८० हजार रूपयांची सूट दिली आहे. या कारची किंमत ४.६३ लाख रूपयांपासून सुरू होते. तर एक्सयूवी५०० वर ६६ हजार रूपयांची सूट दिली जात आहे. यासोबतच कंपनीने स्कॉर्पिओ कारवर ५६ हजार ५०० रूपयांची सूट दिली आहे. 


निसानवर सोन्याचे नाणे मोफत


जपानी कंपनी निसानने त्यांच्या कार्सवरही मोठी ऑफर सुरू केली आहे. यात ते गोल्ड कॉईन ऑफर देत आहेत. कंपनीची कोणतीही कार खरेदी केल्यास ग्राहकांना गोल्ड कॉईन दिला जात आहे. यासोबतच टेरेना कारच्या खरेदीवर ७१ हजार रूपयांची सूट दिली जात आहे.