भोपाळ : व्हॉटस अॅपचे मेसेज वाचणे दिवसेंदिवस कंटाळवाणे, आणि धोकायदायक होत चालले आहे. यामुळे कोणताही मेसेज फॉरवर्ड करताना खूप विचार करा, तसेच तुम्हाला माहित नसताना, ग्रुपचा अॅडमिन करणे देखील धोकादायक आहे. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील एक २१ वर्षाचा मुलगा मागील ६ महिन्यापासून जेलमध्ये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुलाच्या पालकांचं म्हणणं आहे की, त्याची यात कोणतीही चूक नाही. आमच्या मुलाला काहीही माहित नसताना आमचा मुलगा यात अडकला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे, पण या मुलाला मागील ६ महिन्यापासून जामीन मिळालेला नाही.


हा मुलगा त्या ग्रुपचा अॅडमिन नव्हता, पण एकाने ग्रुप बनवला आणि हा मुलगा डिफाल्ट अॅडमिन होता. ग्रुप बनवणाऱ्याने आक्षेपार्ह पोस्ट टाकून ग्रुप सोडून दिला. यामुळे डिफाल्ट ग्रुपअॅडमिन झालेल्या या मुलाला अटक करण्यात आली होती.


राजगढच्या तालेन भागातील बीएसस्सीचा विद्यार्थी जुनैद खान १४ फेब्रुवारीपासून अटकेत आहे, त्याच्या विरोधात आयटी अॅक्टनुसार देशद्रोहासह आणखी काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुनैद हा एका व्हॉटसअॅप ग्रुपचा सदस्य होता. यात यापूर्वीचा अॅडमिन इम्रानने आक्षेपार्ह मेसेज फॉवर्ड केला. स्थानिक लोकांनी इरफान आणि ग्रुप अॅडमिन विरोधात गुन्हा दाखल केला.


पोलिसांनी सांगितलं की, चौकशी सुरू असताना जुनैद हा व्हॉटसअॅप ग्रुपचा अॅडमिन होता. दुसरीकडे जुनैदच्या घरच्यांना म्हणायचं आहे की, पहिल्या ग्रुप अॅडमिनने ग्रुप सोडल्यानंतर जुनैद डिफॉल्ट अॅडमिन झाला. जुनैदचा भाऊ फारूख सांगतो की, आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली गेली तेव्हा जुनैद अॅडमिन नव्हता.


प्रकरण देशद्रोहाचं असल्याने कोर्टाने देखील जुनैदला जामीन देण्यास नकार दिला आहे. जुनैदला परीक्षा देखील देता आलेली नाही. सिनिअर पोलीस अधिकाऱ्यांसोबत आमची चर्चा झाली, सीएम यांच्या हेल्पलाईनवर देखील आम्ही तक्रार केली, पण आमचं ऐकून घेण्यात आलं नाही.


राजगढचे एसपी सिमला प्रसाद आणि प्रकरणाची चौकशी करणारे अधिकारी युवराज सिंह यांनी म्हटलंय की, जुनैदच्या परिवाराने या आधी सांगितलं नाही की, तो डिफॉल्ट अॅडमिन होता. आता कोर्टात प्रकरण दाखल झाल्यानंतर ते सर्व सांगत आहे, आता जुनैदच्या जवळच्यांनी याचे पुरावे सादर करणे गरजेचे आहे.