मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना संसर्गाच्या या काळात सोशल मीडियावरही अफवा आणि खोट्या बातम्यांचं पीक आलं आहे. अशा अफवा आणि खोट्या बातम्या रोखण्यासाठी आता व्हॉट्सऍपने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सऍपने फॉरवर्ड मेसेज पाठवण्यावर निर्बंध आणले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्सऍपने दिलेल्या माहितीनुसार आता कोणत्याही व्यक्तीला व्हायरल होत असलेले मेसेज, मीम, फोटो किंवा व्हिडिओ एकापेक्षा जास्त लोकांना फॉरवर्ड करता येणार नाहीत. कोरोना व्हायरसबाबत खऱ्या माहितीऐवजी खोटी माहिती मिळाली तर लोकं प्रभावित होऊ शकतात, असं कंपनीने सांगितलं आहे. याआधी व्हॉट्सऍपने मेसेज फॉरवर्ड करण्याची क्षमता ५ पर्यंत मर्यादित ठेवली होती.


व्हॉट्सऍपवर चुकीची माहिती आणि अफवा पसरवणारे फक्त भारतातच नाहीत, तर जगभरात आहेत. या कारणामुळे प्रत्येक देशातल्या प्रशासनाला कोरोनाचा सामना करताना अडचणी येत आहेत. या कारणामुळे व्हॉट्सऍपने एक मेसेज फॉरवर्ड करण्याची मर्यादा फक्त एक व्यक्ती किंवा ग्रुपपर्यंत मर्यादित ठेवली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कोरोनाबाबतची चुकीची माहिती आणि अफवांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सगळ्या मोबाईल आणि इंटरनेट कंपन्यांसोबत बैठक घेऊन फॉरवर्ड मेसेजवर लगाम घालण्याची गरज बोलून दाखवली होती.