मिर्जा गालीब : गुगलचा डूडल बनवून शायराला सलाम
गालीबने आयुष्यातील संघर्षाला प्रेमात परावर्तीत केले. हे प्रेम लेखणीमधून कागदावर टीपकत राहिले शायरीच्या रूपात. गालीबला त्यांच्या हायातीत हवा तसा मानमरातब मिळाला नाही. पण, इतिहासाने त्यांची नोंद घेतली.
मुंबई : जगप्रसिद्ध उर्दू शायर मिर्जा गालीब यांची आज (बुधवार,27, डिसेंबर) 220वी जयंती. गालीबच्या शायरीची जगभरात पारायणे केली जातात. इंटरनेट जगतातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलेनही आपल्या हटके अंदाजात या शायराला अनोखा सलाम केला आहे. गुगलने मिर्जा गालीबचे डूडल बनवून अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मिर्जा गालीब यांचे पूर्ण नाव मिर्जा असल-उल्लाह बेग खां असे होते. त्यांचा जन्म 27 डिसेंबर 1797मध्ये आगरा येथील एका सैनिकी परिवारात झाला. तो काळ मुघल शासक बहादुर शाह यांच्या कार्यकाळातला होता. गालीब यांनी फारशी, उर्दू आणि अरबी भाषेत शिक्षण घेतले होते. तसेच, त्या भाषांवर त्यांचे प्रभुत्वही होते.
गुगलचे हटके डूडल
गुगलने गालीबचे बनवलेले डूडलही खास वैशिष्ट्यपूर्ण आहे. आजच्या डूडलमध्ये गाली ब एका हातात पेन आणि दुसऱ्या हातात कागद घेतलेला दिसतो. गालीबची ही छबी उभी आहे ती, मुघलकालीन वास्तूकलेचा उत्कृष्ठ नमुना दर्शवणाऱ्या इमारतीच्या पार्श्वभूमीवर. गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये डूडलबद्दल लिहीले आहे की, 'त्यांच्या शायरीत उदासी दिसते. जी त्याच्या मनाती, आयुष्यात आणि समाजात असलेल्या अस्वस्थतेचे दर्शन घडवते. यात मग त्यांचे कमी वयात आलेले अनाथपऩ असो , आपल्या सात अल्पवयीन बालकांना गमावने असो, किंवा भारतातून मुघलांच्या हातातून सूटत चाललेल्या सत्तेमुळे आलेली राजकीय उलथापालथ असो. गालीब यांनी आयुष्यात आर्थिक बेकारीही प्रचंड प्रमाणात पाहिली. इतकी, की, त्यांना त्यांचे मानधनही अनेकदा वेळेवर मिळाले नाही.'
एकाकी आयुष्यात फुलले प्रतिभेचे फूल
गालीबच्या लहानपनीच वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या काकांनी त्यांचा सांभाळ केला. पण, हा सहवासही त्यांना फार काळ लाभला नाही. त्यांच्या काकांचेही निधन झाले. त्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या काकीने केला. अगदी 13 व्या वर्षीच गालीब यांचा विवाह उमराव बेगम यांच्यासोबत झाला. लग्नानंतर ते दिल्लीत आले आणि तेथेच त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. त्यांनी आपल्या आयुष्यातील संघर्षाला प्रेमात परावर्तीत केले आणि हे प्रेम लेखणीमधून कागदावर टीपकत राहिले. गालीबला त्यांच्या हायातीत हवा तसा मानमरातब मिळाला नाही. पण, इतिहासाने त्यांची नोंद घेतली. आज जगभरात गालीबच्या शायरीची पारायणे केली जातात.