Smartphone Vision Syndrome: सध्या स्मार्टफोन (Smartphone) म्हणजे प्रत्येकाची मुलभूत गरज झाली आहे. म्हणजे एकवेळ एखाद्याकडे डोक्यावर राहण्यासाठी हक्काचं छत नसेल, पण खिशात स्मार्टफोन नक्की असतो. सध्याच्या काळात चारचौघात 'स्मार्ट' दिसण्यासाठी स्मार्टफोन ही एक गरजच झाली आहे. पण याच स्मार्टफोनचा अतीवापर आता अनेक संकटांना निमंत्रण देत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सतत स्मार्टफोनमध्ये गुंतून राहिल्यास तुम्ही आपली दृष्टी गमावू शकता. हा कोणताही अंदाज नाही, तर हैदराबादमध्ये एका महिलेने Smartphone Vision Syndrome चा सामना केला असून तिच्या डॉक्टरांनीच याचा खुलासा केला आहे. त्यामुळे ही बातमी नक्की वाचा आणि स्मार्टफोनचा वापर करताना योग्य काळजी घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादमधील 30 वर्षीय तरुणीला सतत स्मार्टफोनचा वापर करत असल्याने दृष्टीदोष (vision impairment ) झाला होता. या तरुणीच्या डॉक्टरांनी तिची केस स्टडी शेअर केली असून कशाप्रकारे तिला  Smartphone Vision Syndrome झाला आणि कशा पद्धतीने तिने आपली दृष्टी पुन्हा मिळवली हे सविस्तरपणे सांगितलं आहे.


Smartphone Vision Syndrome म्हणजे नेमकं काय?


डॉक्टर सुधीर कुमार यांनी ट्वीट करत संपूर्ण केस स्टडी शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी दिलेलल्या माहितीनुसार, "अनेकदा तरुणीला काही सेकंदांसाठी काहीच दिसत नव्हतं. तिच्या डोळ्यांसमोर पूर्णपणे अंधार होत होता. खासकरुन रात्री वॉशरुमला जाण्यासाठी जेव्ही ती उठत असे तेव्हा हा त्रास जाणवत होता. तिने नेत्रतज्ञांकडे तपासणी केली असता रिपोर्टमध्ये सर्व काही सामान्य होतं. यानंतर तिला न्यूरोलॉजिकल कारणांसाठी रेफर करण्यात आलं होतं".


पुढे त्यांनी सांगितलं आहे की, मंजू नावाच्या या तरुणीने आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी ब्युटिशियनची नोकरी सोडल्यानंतर तिला दृष्टीदोषाची लक्षणं जाणवू लागली होती. आपण अनेक तासांसाठी स्मार्टफोन वापरत असल्याचं तिने सांगितलं होतं. रात्री लाईट बंद केल्यानंतर अंधारात जवळपास दोन तास ती स्मार्टफोन पाहायची. 



डॉक्टर सुधीर कुमार यांनी मंजूला कोणतीही औषधं देण्याऐवजी समुपदेश करण्याचं ठरवलं. त्यांनी तिला स्मार्टफोनचा वापर कमी करण्याचा सल्ला दिला. "मंजूला सुरुवाताली आपल्या मेंदूंच्या पेशींमध्ये काही समस्या निर्माण झाल्याची भीती वाटत होती. पण नंतर तिने योग्य काळजी घेण्याचा निर्धार केला. तिने सांगितलं की, स्मार्टफोनचा वापर कमी करण्यापेक्षा मी तो पूर्णपणे बंद करेन. अत्यंत गरज असेल तेव्हाच आपण स्मार्टफोनची स्क्रीन पाहेन. असंही मोबाइल हे फक्त मनोरंजनाचं साहित्य आहे", अशी माहिती डॉक्टर सुधीर कुमार यांनी दिली.


 


स्मार्टफोन वापरताना काय काळजी घ्यावी


जवळपास एक महिन्यानंतर मंजूची दृष्टीदोष पूर्ववत झाली. तिला रात्रीच्या वेळी होणारा त्रासही बंद झाला. डॉक्टर सुधीर मिश्रा यांनी डिजिटल डिव्हाईस वापरताना प्रत्येक 20 मिनिटांनी 20 सेकंदांचा ब्रेक घ्यावा असा सल्ला दिला आहे. "डिजिटल स्क्रीन वापरताना 20 फूट दूर पाहण्यासाठी प्रत्येक 20 मिनिटांनी 20 सेकंदांचा ब्रेक घ्या (20-20-20 Rule)," असं ते म्हणाले आहेत.