जगातला सर्वात लहान फोन भारतात लॉन्च
एका मोबाईल निर्माती कंपनीने भारतीय बाजारात जगातला सर्वात लहान मोबाईल लॉन्च केलं आहे.
नवी दिल्ली : सॅमसंग, विवो आणि अॅपल सारख्या दिग्गज कंपन्या आकर्षक स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. अशात एका मोबाईल निर्माती कंपनीने भारतीय बाजारात जगातला सर्वात लहान मोबाईल लॉन्च केलं आहे.
इलारी कंपनीने हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. या फोनला NanoPhone C चं अपग्रेड व्हर्जन मानलं जात आहे. NanoPhone C च्या जुन्या व्हर्जनला कंपनीने जुलैमध्ये लॉन्च केला होता. त्यावेळी या स्मार्टफोनची किंमत ३९४० रूपये ठेवण्यात आली होती. आता या नव्या फोनची किंमत कमी ठेवण्यात आली आहे.
जर तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ऑनलाईन Yerha.com वरून विकत घेतला जाऊ शकतो. २ हजार ९९९ रूपये किंमत असलेल्या या फोनला प्लेटिनम सिल्व्हर, रोज गोल्ड आणि ब्लॅक रंगात लॉन्च करण्यात आला आहे. जगातल्या सर्वात लहान स्मार्टफोनचे फंक्शन आणि डिझाईन ब-याचअंशी जुन्या फोनसारखेच आहेत. हा फोन ब्लूटूथला सपोर्ट करतो.
हा जगातला सर्वात लहान फोन असण्यासोबतच सर्वात कमी वजनाचाही आहे. या फोनचं वजन केवळ ३० ग्रॅम आहे. या नव्या मॉडेलमध्ये कंपनीने जास्त फिचर्स वाढवले नाहीयेत. कंपनीकडून सांगितले गेले आहे की, हे फिचर्स या फोनसाठी पुरेसे आहेत. नॅनो सी फोनमध्ये ब्लूटूथ, कॉल रेकॉर्डर, कॅलक्युलेटर, ३२ जीबी मायक्रोएसडी कार्डचा सपोर्ट देण्यात आलाय. या फोनमध्ये मायक्रो सिम टाकता येतं. यासोबतच मनोरंजनासाठी यात MP3 प्लेअर, FM रेडिओ अलार्म आणि व्हॉईस रेकॉर्डर दिलं गेलंय.
नॅनो फोन सी मध्ये १.० इंचाचा TFT डिस्प्ले देण्यात आलाय. यात मीडिया टेक MT6261D प्रोसेसर दिलं गेलं आणि सोबतच ३२ एमबीची रॅम देण्यात आलीये. तसेच ३२ एमबी इंटरनल मेमरी दिली आहे. जी मायक्रो एसडी कार्डने ३२ जीबी पर्यंत वाढवली जाऊ शकते. तसेच या फोनला 280mAh बॅटरी देण्यात आलीये. कंपनीचा दावा आहे की, या फोनवरून लागोपाठ ४ तास बोलणं होऊ शकतं.