Repair Mode to keep Photos Safe during Smartphone: आजच्या काळात स्मार्टफोनचा वापर प्रत्येकजण करत असतो. पण कधी कधी फोन खराब होतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमचा फोन एखाद्या दुकानात दुरुस्तीसाठी दिला तर फोनमध्ये सेव्ह केलेले वैयक्तिक फोटो, व्हिडीओ आणि डॉक्युमेंट्स यांचा गैरवापर होऊ शकतो. आपला पर्सनल डेटा लीक होऊ नये, यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. स्मार्टफोन ब्रँड सॅमसंगने तुमची ही चिंता दूर करण्यासाठी खास फीचर आणलं आहे. सॅमसंगने 'सॅमसंग रिपेअर मोड' हे नवीन फीचर आणले आहे जे तुमच्या मीडिया फाइल्स पूर्णपणे सुरक्षित ठेवतं. हा रिपेअर मोड काय आहे आणि तो कसा काम करतो असा प्रश्न तुम्हाला पडत असेल,  तर या मोडबद्दल सर्व काही जाणून घेऊयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅम मोबाईलच्या रिपोर्टनुसार, सॅमसंग आपल्या स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी रिपेअर मोड नावाच्या नवीन गोपनीयता फीचरवर काम करत आहे. सॅमसंगच्या कोरियन वेबसाईटवर हे फीचर पहिल्यांदा दिसलं आहे. हा मोड चालू करून, तुमचा फोन दुरुस्त करणाऱ्यांना तुमच्या स्मार्टफोनवर मर्यादित प्रवेश दिला जाईल. हा मोड चालू केल्यानंतर, तुमचे सर्व फोटो, मेसेज आणि खाते फोन दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीपासून लपवले जातील. अशा प्रकारे, स्मार्टफोन रिपेअर करणारी व्यक्ती तुमच्या फोनमधील सामग्रीचा गैरवापर करू शकणार नाहीत. 


स्मार्टफोनच्या सेटिंग्जमधील 'बॅटरी अँड डिव्हाईस केअर' या पर्यायावर जाऊन हा मोड सुरू करता येतो. सध्या हा मोड Samsung Galaxy S21 सीरीजसाठी रिलीज केला जात आहे. परंतु येत्या काळात हे फीचर आणखी मॉडेल्ससाठी आणले जाईल.