अनधिकृत बांधकामांच्या चौकशी फाईल्स गायब; ठाणे महापालिकेतील धक्कादायक प्रकार
![अनधिकृत बांधकामांच्या चौकशी फाईल्स गायब; ठाणे महापालिकेतील धक्कादायक प्रकार अनधिकृत बांधकामांच्या चौकशी फाईल्स गायब; ठाणे महापालिकेतील धक्कादायक प्रकार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2023/10/13/654104-investigation-report-of-unauthorized-constructions-in-thane-is-missing-from-the-municipal-headquarters.jpg?itok=qHD6AfUL)
Thane News : ठाणे महापालिका क्षेत्रात बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगांवकर यांनी यासंदर्भात कारवाईची मागणी केली आहे.
विशाल वैद्य, झी मीडिया, ठाणे : ठाणे महानगरपालिका (TMC) क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांबाबत (Unauthorized constructions) तत्कालीन पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या कार्यकाळात तयार केलेल्या चौकशी अहवालाच्या नस्ती आणि कारवाईसंदर्भातील ठराव गहाळ झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याच सोबत तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते संजय घाडीगांवकर यांनी दिलेली अनधिकृत बांधकामांची यादी आणि फोटोही गहाळ झाल्याचा आरोप केलाय. या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून ती मान्य झाली नाही तर न्यायालयाकडे (High Court) दाद मागणार असल्याचं घाडीगांवकर यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवरून ठाण्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
माजी नगरसेवक आणि उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगांवकर यांनी सन 2019 ते 2021 या कालावधीतील महापालिका क्षेत्रात दिवा, मुंब्रा, कळवा, माजिवडा - मानपाडा, वर्तकनगर, नौपाडा, कोपरी आणि उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकामाच्याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. घाडीगांवकर यांनी याप्रश्नी न्यायालयातही धाव घेतली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने तक्रारीची दखल घेत तत्कालीन आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी 2021 मध्ये याप्रश्नी चौकशी समिती गठीत केली होती.
या चौकशी अहवालांच्या संदर्भात महत्वाच्या नस्ती तयार करण्यात आल्या होत्या. या अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासंदर्भात आदेश प्रशासनाला देत याबाबत ठराव देखील करण्यात आले होते. त्याचप्रमाणे अनाधिकृत बांधकामांची यादी आणि अनाधिकृत बांधकामाचे फोटो असे महत्वाचे पुरावे घाडीगांवकर यांनी प्रशासनाला सादर केले होते. आता हे पुरावे, ठराव तसेच नस्ती गहाळ झाल्याचे समोर आलं आहे.
हे जाणीवपूर्वक करण्यात आले असून दोषी अधिकाऱ्यांनाही पाठीशी घालण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप घाडीगांवकर यांनी केला आहे. यामागे ठाण्यातील बडे राजकीय नेते आणि सत्ताधारी ,अधिकारी यांची मिलीभगत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय..यबाबत गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयाकडे याबाबत दाद मागू असा इशारा घाडीगांवकर यांच्याकडून देण्यात आलाय. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून संपूर्ण प्रकरणी चौकशी केली गेली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केलीय.