Mumbai-Thane Traffic News in Marathi : मुंबई- ठाणे हे दोन्ही शहर हायटेक करण्याच्या उद्देशानं प्रशासन महत्त्वाचे पावलं उचलत आहे. सध्याच्या घडीला शहरातील विविध भागांना जोडण्यासाठी कोस्टल रोडसह मोने, मेट्रो, उड्डाणपूल आदी प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यात आणखी एका प्रकल्पाची भर पडली असून पूर्व द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडींतून सुटका होईल, तसेच मुंबई-ठाणे प्रवास एकाही सिग्नलशिवाय नॉन स्टॉप प्रवास करणं शक्य होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई-ठाणे प्रवास सुसाट होणार असून ठाणे दिशेकडील 1.23 किमी लांबीच्या दोन पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण करुन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे मानखुर्द ते ठाणे दिशेकडे जाणारी वाहतूक सिग्नल मुक्त होऊन पूर्व द्रुतगती महामार्गावरील नवी मुंबईहून ठाण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत होईल. तसेच नवी मुंबईकडून येणारी वाहने विनाविलंब ठाण्याच्या दिशेने सुसाट प्रवास करतील.  


सांताक्रूझ चेंबूर रस्ता आणि पूर्व द्रुतगतीमार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई उपनगरातील तसेच नवी मुंबई ते मुंबई ठाण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीमुळे घाटकोपर येथील छेडा नगर जंक्शनवर मोठी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी छेडा नगर जंक्शन सुधार प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) हाती घेतला आहे. याअंतर्गत एकूण तीन उड्डाणपूल आणि एक भुयारी मार्ग बांधण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी 223.85 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सदर प्रकल्पांतर्गत सांताक्रूझ चेंबूर आणि जोडरस्त्याला जोडणाऱ्या उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. 


दरम्यान घाटकोपरमधील छेडानगर हे पूर्वद्रुतगती महामार्गावरील प्रमुख जंक्शन आहे. मानखुर्द घाटकोपर लिंक रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबईकडून येणाऱ्या वाहनांमुळे पूर्वीच्या द्रुतगती मार्गावरील छेडानगर जंक्शन येथे वाहतूक कोंडी होत होती. तसेच ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना सिग्नलवर बराच वेळ थांबावं लागत असे. पुलाच्या उद्घाटनामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता विनाव्यत्यय आणि सिग्नल विरहीत होणार आहे.  


पूर्व-पश्चिम एक्सप्रेस हायवे कनेक्शन


सांताक्रूझ-चेंबूर द्रुतगती महामार्ग विस्तार प्रकल्पाच्या पहिल्या विभागातील कुर्ला ते वाकोला, रझाक जंक्शन या 3.03 किमी लांबीच्या उन्नत रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. BKC आणि कुर्ला भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि सध्याच्या सांताक्रूझ-चेंबूर रोड (SCLR) द्वारे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग जोडण्यासाठी MMRDA राज्य सरकारच्या सहकार्याने सांताक्रूझ-चेंबूर द्रुतगती मार्ग प्रकल्प दोन भागात राबवत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 5.9 किमी उन्नत रस्ता तयार करण्यात येणार आहे.