Thane News : राज्यात शिंदे गट भाजपासह सत्तेत आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरु असलेला संघर्ष अद्यापही कायम आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टात सरकार वैध की अवैध याबाबत सुनावणी सुरु असताना दुसरीकडे शिंदे गट मात्र स्थानिक पातळीवर पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिवसेनेतील फुटीनंतर अनेक मोठ्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून आता राष्ट्रवादीचा एक मोठा नेता प्रवेशाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे. याचं कारण ठाण्यात लागलेला एक बॅनर ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र जर तसं झालं तर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल. 


चर्चेचं कारण काय? 


नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात बॅनर लागले आहेत. नजीब मुल्ला यांचा वाढदिवस असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून लावलं जाणं अपेक्षित होतं. पण याउलट शिंदे गटाने ह बॅनर्स लावले असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे गटाच्या बॅनर्सवर नजीब मुल्ला यांचा फोटो असल्याने ठाण्यात राजकीय चर्चा रंगली आहे. 


बॅनरवरुन नजीब मुल्ला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसंच या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो आहेत. 


ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असल्याने तिथे पक्षाला आणखी मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नजीब मुल्ला यांची मुंब्र्यात चांगली पकड असून जर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास मोठा फायदा होईल. दरम्यान आगामी दिवसात मुंब्र्यातील काही नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.