सेल्फी ढाब्यावर सेक्स रॅकेटचा भांडाफोड, ८ जणांना अटक
मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील सेल्फी ढाब्यावर चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा पालघर पोलिसांनी मंगळवारी रात्री भांडाफोड केला.
मुंबई - मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील सेल्फी ढाब्यावर चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा पालघर पोलिसांनी मंगळवारी रात्री भांडाफोड केला. परराज्यातील मुली आणून या ठिकाणी त्यांच्याकडून सेक्स रॅकेट चालवले जात होते. पालघरचे पोलिस अधीक्षक गौरव सिंह यांचे गुन्हे प्रतिबंधक पथक आणि वालीव पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी एकूण आठ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये ढाब्याचा व्यवस्थापक, एक दलाल आणि इतर सहा जणांचा समावेश आहे.
अहमदाबाद मार्गावरील सेल्फी ढाब्यावर वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे या ढाब्याच्या दर्शनी भागावरच रुमचा दर प्रतितास ६०० रुपये असा फलक लिहिण्यात आला होता. या रुमचा वापर केवळ वेश्याव्यवसायासाठीच केला जात होता. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील लोकांसाठी १८ ते २५ वयोगटातील मुली वेश्याव्यवसायासाठी या ठिकाणी पुरविल्या जायच्या. काल या ढाब्यावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर तेथून २० ते २५ वयोगटातील चार मुलींची सुटका करण्यात आली. यामध्ये एका बांगलादेशी तरुणीचाही समावेश आहे. पैशांचे आमिष दाखवून या तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. पालघर पोलिस पुढील तपास करीत आहेत.