Thane News : ठाण्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. लेकीला कॉलेजला सोडण्यासाठी गेलेल्या बापाचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कॉलेजला जाणाऱ्या मुलीला कळवा कारशेडमध्ये सोडण्यासाठी गेलेल्या वडिलांना लोकलने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर मुलीच्या डोक्यावरुन वडिलांचे छत्र हरवलं आहे. रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी नोंद करुन पुढील कारवाई सुरु केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणपतसिंह हुकूमसिंह राजपूत (49) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. कळव्यातील मनीषानगर भागात राहणारे गणपतसिंह राजपूत एका सराफाच्या दुकानात काम करतात. गणपतसिंह शुक्रवारी सकाळी भांडूप इथल्या कॉलेजमध्ये जाण्याऱ्या मुलीला सोडण्यासाठी कळवा कारशेडमध्ये गेले होते. मुलीला लोकलमध्ये सोडल्यानंतर गणपतसिंह तिथून निघाले. मात्र परतत असताना सीएसएमटी येथून कल्याणकडे जाणाऱ्या एका लोकलची त्यांना धडक बसली. या धडकेत राजपूत हे गंभीर जखमी झाले आणि खाली कोसळले. जखमी झालेल्या राजपूत यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.


कसा घडला अपघात?


गणपतसिंह राजपूत यांनी मुलीला त्यांनी ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलमध्ये सोडले, ती लोकलही या अपघातामुळे काही काळ पुढे गेली नाही. त्यामुळे गर्दी कशामुळे झाली हे पाहण्यासाठी मुलगी खाली उतरली होती. त्यावेळी आपल्याच वडिलांना लोकलची धडक बसल्याचे तिला दिसले. वडिलांना खाली पडलेलं पाहताच मुलगी मदतीसाठी धावत सुटली. नागरिकांनी रेल्वे पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने गणपतसिंह राजपूत यांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच राजपूत यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे राजपूत कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.


ठाण्यात कंटेनरला भीषण आग, अपघातात एकाचा मृत्यू.


गुरुवारी ठाण्यातील घोडबंदर रोडवर एका कंटेनरला भीषण आग लागली होती. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. घोडबंदर रोडवर नियंत्रण सुटल्याने ट्रकने पलटी होऊन पेट घेतला. मालाने भरलेले अवजड ट्रक ठाण्यापासून घोडबंदर रोडला जोडणाऱ्या रस्त्यावरील नियंत्रण सुटून उलटला आणि त्याला आग लागली अशी माहिती ठाणे महापालिकेने दिली.